‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री हे नाव आता सगळ्यांनाच परिचयाचं झालं आहे. या चित्रपटाने एक वेगळाच इतिहास रचला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं तर काही ठिकाणी या चित्रपटाला प्रचंड विरोध झाला. या चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाइल्स’ या चित्रपटावर काम करणार असल्याची चर्चा होती. खुद्द अग्निहोत्री यांनीदेखील या गोष्टीची पुष्टी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार नुकतंच विवेक अग्निहोत्री यांनी ‘दिल्ली फाइल्स’आधी एका वेगळ्या विषयावर काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. देशात कोविड काळात कशाप्रकारे covaxin ही लस तयार करण्यात आली ती गोष्ट विवेक अग्निहोत्री चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार आहेत. १० डिसेंबरपासून ४५ दिवस अग्निहोत्री या चित्रपटाचं चित्रीकरण करणार आहेत.

नुकतंच विवेक यांची पत्नी पल्लवी जोशी हिने एक पोस्टर शेअर करत या चित्रपटाचं योग्य नाव ओळखायला सांगितलं आहे. या पोस्टरमध्ये विवेक अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट ‘द __ वॉर’ असं लिहिण्यात आलं आहे. हे पोस्टर शेअर करताना पल्लवीने चाहत्यांना अचूक नाव ओळखून ते कॉमेंटमध्ये लिहिण्यास सांगितलं आहे. त्यामुळे या पोस्टवर काही लोकांनी फार मजेशीर कॉमेंट केल्या आहेत तर काहींनी कोविड काळाशी निगडीत अचूक नाव ओळखायचा प्रयत्न केला आहे.

या नव्या चित्रपटाविषयी बोलताना अग्निहोत्री यांनी स्पष्ट केलं की, “मी आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल यांचं पुस्तक (Balram Bhargava’s Going Viral – Making of Covaxin: The Inside Story) वाचलं आहे. या पुस्तकात कशाप्रकारे कित्येक लोकांनी, महिलांनी अजिबात न थकता एवढ्या लसी तयार केल्या आणि २५० कोटी लोकांना त्या देण्यात आल्या. बऱ्याच सामान्य लोकांना ही गोष्ट ठाऊक नाहीये, त्यामुळे ही गोष्ट मी त्यांच्यासमोर घेऊन येणार आहे.”

आणखी वाचा : ३० हजार कोटीचं साम्राज्य आणि मुंबईचं एकमेव सरकार; ‘धारावी बँक’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, निवेदिता भट्टचार्य, हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय ही कथा संपूर्णपणे एका पात्राची गोष्ट असेल. याचं चित्रीकरण लखनौमध्ये होणार असून यात ९०% कलाकार हे स्थानिक असतील असं आश्वासनही अग्निहोत्री यांनी दिलं आहे. तसेच ‘दिल्ली फाइल्स’वर अजूनही रिसर्च सुरू असून या चित्रपटानंतरच त्यावर काम सुरू होईल असंही विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek agnihotri and pallavi joshi upcoming film on covid vaccine social media post viral avn
Show comments