सध्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची जबरदस्त हवा आहे. प्रचंड विरोध होत असूनही तिकीटबारीवर प्रेक्षक यासाठी गर्दी करताना दिसत आहे. या चित्रपटासारखाच प्रतिसाद गेल्या वर्षी आलेल्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मिळाला होता. या चित्रपटालाही बराच विरोध झाला होता. नुकताच ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये बॅन करण्यात आला असून याविषयी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘द कश्मीर फाइल्स’चाही उल्लेख केला.
यामुळेच आता दिग्दर्शिक विवेक अग्निहोत्री यांनी ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मंगळावरी एका ट्वीटच्या माध्यमातून विवेक यांनी याविषयी माहिती दिली. केवळ विवेक यांनीच नव्हे तर चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनीही नोटीस पाठवली असून त्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आणखी वाचा : वयाच्या ७९ व्या वर्षी दिला सातव्या अपत्याला जन्म; अभिनेते रॉबर्ट डी निरो यांचा खुलासा
आपल्या ट्वीटमध्ये विवेक लिहितात, “अभिषेक आणि पल्लवी जोशीसह मीदेखील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी आमच्या आणि आमच्या ‘द कश्मीर फाइल्स’ अन् आगामी चित्रपट ‘दिल्ली फाइल्स’बद्दल अपमानकारक भाषेत टिप्पणी केली आहे.” यामुळेच हे पाऊल या चित्रपटाच्या निर्मात्यांनी उचलले आहे.
सोमवारीच पश्चिम बंगालच्या सरकारने ‘द केरला स्टोरी’च्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. याबरोबरच ‘द कश्मीर फाइल्स’चा उल्लेख करीत ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले होते की हा चित्रपट समाजातील एका विशिष्ट वर्गाचा अपमान करणारा आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांनी हा दावादेखील केला की, विवेक अग्निहोत्री ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटावर काम करीत आहेत आणि यासाठी त्यांना भाजपाकडून आर्थिक पाठबळ मिळाले आहे.