The Vaccine War Review: चित्रपट म्हंटलं की त्यात ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन, इमोशन आणि जमल्यास लोकांसाठी थोडंफार बौद्धिक असा आपला समज होतो. गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे चित्रपट म्हंटलं की लोकांचं पद्धतशीर ब्रेनवॉश अन् जमल्यास ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन अन् मनोरंजन असं चित्र पाहायला मिळत आहे, अन् अशातच आता विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ची भर पडलेली आहे. संपूर्ण चित्रपट पाहिला तर आपल्याला तो नोलनच्या नुकत्याच आलेल्या शब्द बंबाळ अशा ‘ओपनहायमर’ची आठवण करून देतो. परंतु ‘ओपनहायमर’मध्ये नाण्याच्या दोन्ही बाजू ज्या शिताफीने नोलने दाखवल्या होत्या तशा नाण्याच्या दोन बाजू दाखवण्यात ‘द व्हॅक्सिन वॉर’ कमी पडतो.
जी मंडळी अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट डोक्यात ठेवून हा नवा चित्रपट बघायला जातील त्यांची तर पुरतीच निराशा होणार आहे, कारण ‘द काश्मीर’ फाइल्स’ हा चित्रपटही सत्य घटनांवर बेतलेला असला तरी त्याला एका खिळवून ठेवणाऱ्या कथानकाची जोड होती आणि त्यामुळेच तो चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालू शकला. ‘द व्हॅक्सिन वॉर’ मात्र याच्या तुलनेत अत्यंत उदासीन व सपकरित्या मांडलेली डॉक्युमेंटरी वाटतो.
आणखी वाचा : नाना पाटेकरांचा सूर बदलला? पहिले नाव न घेता केली ‘जवान’वर टीका, तर आता केलं शाहरुखचं कौतुक
कोविड काळातील ती दोन वर्षं ही कोणताही भारतीय कधीच विसरू शकणार नाही. देशात माजलेली अनागोंदी, लॉकडाउनचे भयाण दिवस, टेलिव्हिजन व मीडियाच्या माध्यमातून समोर येणारी हृदयद्रावक दृश्यं, हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण, बाहेरील देशांकडून केली जाणारी भारताची कोंडी, एकूणच लसींच्या बाबतीत लोकांमध्ये पसरलेली गैरसमजूत अशा कित्येक मुद्द्यांना अग्निहोत्री यांनी अगदी वरचेवर हात लावला आहे. लस तयार करण्याच्या प्रक्रियेबाबतसुद्धा फार खोलात शिरून लोकांना समजेल अशा भाषेत कथानक मांडायचं सोडून या सगळ्याला मीडिया कसा जबाबदार होता हे मांडण्यात अन् त्यावेळच्या सरकारचे गोडवे गाण्यातच अग्निहोत्री यांनी अधिक वेळ खर्ची केला आहे.
भारताची पहिली स्वतःची लस तयार करण्याच्या प्रक्रियेत ICMR आणि NIV यांचा वाटा किती मोठा होता अन् त्यांना भारत बायोटेकची मिळाली जोड हे आपण जाणतोच, पण या प्रक्रियेत ज्या महिलांचं एवढं मोठं योगदान होतं त्यांच्या पात्रावर म्हणावं तितकं लक्ष न दिल्याने यातील पल्लवी जोशी व गिरिजा ओकने साकारलेलं पात्र वगळता इतर कोणतंही पात्र आपल्यावर प्रभाव पाडण्यात यशस्वी होत नाही. ICMR चे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव यांच्या ‘गोइंग व्हायरल’ या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला आहे, पण त्यांचं पात्रंदेखील म्हणावं तितकं उत्तमरित्या सादर करण्यात आलेलं नाही. कथा, पटकथा अत्यंत स्लो अन् त्यातून सतत कानावर पडणारे लांबलचक डायलॉग यामुळे कितीही ठरवलं तरी याला चित्रपटाचा फील येणं असंभव आहे.
विवेक अग्निहोत्री यांची सध्याची विचारधारा अन् त्यांचे चित्रपट पाहता त्यांच्याकडून या अशाच चित्रपटाची अपेक्षा होती अन् यात अजिबात संशय नाही. चित्रपटात कोणतंही गाणं नाही की कुठे खिळवून ठेवणारं नाट्य नाही. केवळ काही ठिकाणी गंभीर बॅकग्राऊंड म्युझिक अन् श्वसनाचा त्रास होण्याचा एका विचित्र आवाजाच्या माध्यमातून तणाव निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न तितका यशस्वी झालेला नाही. संवादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही ठिकाणी टेक्निकल भाषेचा अतिवापर अन् काही ठिकाणी व्हॉट्सअप फॉरवर्डसारखे लोकांना उपदेशाचे डोस देणारे संवाद यामुळे संपूर्ण विषयाचं गांभीर्य निघून जातं. निवेदिता गुप्ता यांचं पात्र साकारणाऱ्या गिरिजा ओकचा आपल्या मुलाला सोडून एमर्जन्सि म्हणून घराबाहेर पडतानाचा सीन मात्र तितका अंगावर येतो बाकी सगळाच आनंदी आनंद आहे.
अभिनयाच्या बाबतीत पल्लवी जोशी, गिरिजा ओक यांची कामं लक्षात राहण्याजोगी आहेत. ‘कांतारा’फेम सप्तमी गौडा, निवेदिता भट्टाचार्य, अनुपम खेर यांची कामंही यथा तथाच आहेत. सरकारविरोधी अन् देशविरोधी कारवाया करणाऱ्या रायमा सेनचं पत्रकाराचं पात्र तर काही ठिकाणी अत्यंत हास्यास्पद वाटतं. नाना पाटेकर यांच्याही अभिनयात किंवा पात्रात काहीच नावीन्य आपल्याला पाहायला मिळत नाही. इतरही कलाकारांची कामंही ठीक ठाक झालेली आहेत.
कोविड काळात बऱ्याच गोष्टी आपल्या कानावर पडल्या, त्यादरम्यानचं जागतिक राजकारण हे आपण अनुभवलं, यानंतर आपण कित्येक संकटांवर मात करत लसीकरण मोहिमेत अव्वल आलो, कित्येक देशांना आपण लसी पुरवल्या, आपण त्याचं पेटंट फाइल केलं नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेच. पण केवळ काही घटनांचा आधार घेऊन या काळादरम्यान माजलेल्या अनागोंदीचं खापर मीडियावर फोडायचं अन् सत्तेत असलेल्या सरकारवर स्तुतिसुमनं उधळायची याच उद्देशातून ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट अग्निहोत्री यांनी लोकांसमोर आणला आहे असं निदान चित्रपट पाहताना सतत जाणवत राहतं. चित्रपटाच्या दृष्टीकोनातून पाहाल तर यात तसं फार काही नवीन बघायला किंवा शिकायला मिळणार नाही, पण जर तुम्हाला अशाच धाटणीचे चित्रपट आवडत असतील तर तुम्ही एकदा नक्कीच हा चित्रपट पाहू शकता, फार अपेक्षा ठेवून चित्रपट पाहण्यात काहीच अर्थ नाही हे मात्र नक्की.