‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची गेल्यावर्षी चांगलीच चर्चा झाली. चित्रपटाला मिळालेलं अभूतपूर्व यश आणि त्यावरून झालेली टीका यामुळे विवेक सोशल मीडियावर सतत चर्चेत होते. नुकतंच ‘पठाण’मधील बिकिनी वादातसुद्धा त्यांनी उडी घेत त्यांचं मत मांडलं. यावरून ते प्रचंड ट्रोलही झाले. विवेक सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. नुकतंच त्यांनी कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना सोशल मीडिया पोस्टमधून टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतल्यावर नुकतंच प्रियंका गांधी यांनी यावर त्यांचं मत मांडलं, शिवाय दिल्लीच्या राजघाट परिसरात त्यांनी त्यांच्या कुटुंबाची बाजू मांडायचा प्रयत्न केला, शिवाय घराणेशाहीचा त्यांच्यावर आरोप केला जातो यावरही त्यांनी सडेतोड भाष्य केलं. प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्यावरुनच विवेक अग्निहोत्री यांनी त्यांना करण जोहरच्या चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला आहे.
आणखी वाचा : सामान्य गृहिणी अन् गुप्तहेराचा डॅशिंग अंदाज; राधिका आपटेच्या आगामी ‘मिसेस अंडरकव्हर’चा टीझर प्रदर्शित
प्रियंका गांधी म्हणाल्या, “तुम्ही परिवारवादाबद्दल बोलता, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या परिवारासाठी वनवासात गेलेले प्रभू श्रीराम हे परिवारवादी होते का? तुम्ही पाडवांना परिवारवादी म्हणाल का? आमच्या कुटुंबातील सदस्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं त्याची आम्हाला लाज वाटायला हवी का? या देशाचं लोकतंत्र शाबूत ठेवायचं काम माझ्या कुटुंबाने पदोपदी केलं आहे. पण आता बास आम्ही आता सहन करणार नाही. एखाद्या व्यक्तीचा किती अपमान करावा?”
‘एएनआय’ने शेअर केलेल्या प्रियंका गांधी यांच्या या व्हिडिओ क्लिपबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी भाष्य केलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत विवेक यांनी ट्वीट केलं. ट्वीटमध्ये ते म्हणाले, “परिवार…परिवार…परिवार… तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय? आणि जर कुटुंबावर एवढं खोटं प्रेम उतू जाट असेल तर तुम्ही सर्व गांधी कुटुंबीयांनी करण जोहरच्या चित्रपटात काम करायला सुरुवात करायला हवी. तुमची त्यांच्याशी तरी नाळ जुळेल, काय माहीत तुम्ही करण जोहरलासुद्धा बरबाद कराल.”
विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. हा चित्रपट कोविड काळातील भारतात बनलेल्या लसीच्या उत्पादनाबद्दल आणि त्यामागील संघर्षाबद्दल भाष्य करणारा आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.