‘द कश्मीर फाईल्स’ काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच विक्रम रचला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे बरेच चर्चेत आले.
आपली राजकीय मतं, विचारधारा अन् बॉलिवूडच्या विरुद्ध पुकारलेलं बंड यासाठी विवेक अग्निहोत्री ओळखले जातात. आपल्या ट्वीटमधून अन् मुलाखतीमधून बॉलिवूडच्या कंपूशाहीवर तसेच घराणेशाहीवर टीका करत असतात. नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्यांनी यावार स्पष्टीकरण देत बॉलिवूडबाबत कसलाही आकस त्यांच्या मनात नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा : “चित्रपट यशस्वी झाला की…” पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांबद्दल नसीरुद्दीन शाह यांचं वक्तव्य चर्चेत
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मला ज्या गोष्टीबद्दल ज्ञान नाही त्याविषयी मी बोलत नाही. माझ्या मनात बॉलिवूडबद्दल कोणताही आकस नाही. मी बॉलिवूडविषयी बोलतो कारण त्यांनी स्वतःमध्ये बदल करावेत असं मला वाटतं. बॉलिवूड हे आपल्या देशासाठी हास्यास्पद न बनता आपली सॉफ्ट पॉवर बनली पाहिजे. सगळ्या लोकांना आपल्या चित्रपटातील गाण्यांचं, वेशभूषेचं फार अप्रूप असतं, पण कुणालाही आपल्या कथांची नक्कल करावीशी वाटत नाही. त्यामुळे बॉलिवूडबद्दल मी फार कळकळीने बोलत असतो.”
लवकरच विवेक अग्निहोत्री ‘द काश्मीर फाइल्स’चा पुढील भाग झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. याबरोबरच विवेक अग्निहोत्री हे ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा चित्रपटही लवकरच घेऊन येत आहेत. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेरसारखे कलाकार दिसणार आहेत.