IFFI ज्युरी प्रमुख ‘द काश्मीर फाईल्स’बद्दल : गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. वेगवेगळ्या चित्रपटांचं या महोत्सवात स्क्रीनिंग झालं. मातब्बर कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच इतरही देशातील प्रतिष्ठित कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. वेगवेगळ्या कलाकारांनी या मंचावर त्यांचं मनोगत आणि चित्रपटसृष्टीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

या महोत्सवातील ज्युरी हेड आणि इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनीही महोत्सवात मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’वर निशाणा साधला. अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने तब्बल ३०० कोटीहून अधिक कमाई केली. यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट होता. या चित्रपटामुळे बरेच वादही निर्माण झाले. या चित्रपटाला लॅपिड यांनी या चित्रपटाला ‘प्रोपगंडा’ आणि ‘व्हल्गर’ चित्रपट असे संबोधले आहे. शिवाय या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाची निवडही अयोग्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : “हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्यूरींनीच साधला ‘द काश्मिर फाईल्स’वर निशाणा

त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर त्यांना विरोध होत आहे. चित्रपटसृष्टीतीलही बऱ्याच कलाकारांनी या वक्तव्याचा विरोध केला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी मात्र या प्रकरणावर मार्मिक टिप्पणी करत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. कोणालाही टॅग न करता विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं की, “सत्य ही फार भयानक गोष्ट आहे, सत्य कोणालाही खोटं बोलायला भाग पाडू शकतं.”

लॅपिड यांच्या वक्तव्याचा अभिनेते अनुपम खेर यांनीही निषेध केला आहे, शिवाय चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या दर्शन कुमारने या गोष्टीची निंदा केली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला भारतात प्रदर्शित करण्याआधी इतर देशांमध्ये दाखवण्यात आलं होतं. शिवाय या चित्रपटाला भारतात अभूतपूर्व असं यश मिळालं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर विवेक अग्निहोत्री कोविड काळातील लसीकरण या विषयावर चित्रपट आपल्यासाठी घेऊन येत आहेत.

Story img Loader