चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. विविध विषयांवर ते आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त अग्निहोत्री यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी ‘रघुपती राघव राजा राम’ या भजनाचा व महात्मा गांधींचा उल्लेख केला आहे.
विवेक अग्निहोत्रींनी लिहिलं,“गांधीजींनी एका हिंदू भजनात ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ हे शब्द टाकून ते भजन बदललं. पण त्यांना हे माहित होतं की ईश्वर आणि अल्लाह या विरोधी संकल्पना आहेत. भोळ्या जनतेला फसविण्याची ही एक युक्ती होती. गांधीजींचा स्वतःचाही यावर विश्वास नव्हता. कारण त्यांचे शेवटचे शब्द: ‘हे राम!’ होते.”
दरम्यान विवेक अग्निहोत्री यांच्या पोस्टवर युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींनी त्यांच्या म्हणण्याचं समर्थन केलं आहे, तर काहींनी त्याविरोधात कमेंट्स केल्या आहेत. विवेक अग्निहोत्री यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट फ्लॉप झाला होता. यात नाना पाटेकर, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट करोनाच्या साथीनंतर भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या लसनिर्मितीवर आधारित होता.