Bollywood director On Mumbai Local : कलाविश्वातील बरेच कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते अलीकडच्या काळात सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय असो किंवा सामाजिक सामान्य नागरिकांच्या हितासाठी काही निवडक अभिनेते व दिग्दर्शक नेहमीच आवाज उठवत असतात. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत पावसामुळे आणि अन्य काही तांत्रिक कारणांमुळे लोकल सेवेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. आजही ( २४ जुलै ) काही तांत्रिक कारणांमुळे मुंबईची लोकल सेवा खोळंबली होती. यानंतर बहुतांश प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालत जात पुढचा प्रवास सुरू केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबई लोकल ठप्प झाल्याने ट्रेनमधून हजारो प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी रुळांवरून प्रवास करत निघाले. हा व्हिडीओ अनेक ठिकाणी व्हायरल होत असून याबाबत बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ( Bollywood director) यांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राची हास्यजत्रा : समीर चौघुलेंनी शिवाली परबला दिलं गिफ्ट! कारण आहे खूपच खास, फोटो शेअर करत म्हणाली…
प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शकाची पोस्ट
‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक व प्रसिद्ध चित्रपट निर्माते म्हणून ओळखले जाणारे विवेक अग्निहोत्री यांनी बुधवारी ( २४ जुलै ) सकाळी लोकल ठप्प झाल्याने मुंबईकरांचे कसे हाल झाले याचा व्हिडीओ शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे. सायन – माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान ऐन गर्दीच्या वेळेत तांत्रिक बिघाड झाल्याने ही रेल्वे सेवा ठप्प झाली होती.
सोशल मीडियावर सध्या याचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असून याबाबत विवेक अग्निहोत्री म्हणतात, “मुंबईतील लोकल सेवा ठप्प झाल्याने आज मुंबईकरांना असा रुळांवरून पायी जात प्रवास करावा लागत आहे. माझा एक साधा प्रश्न आहे… कोणत्याही सुसंस्कृत देशात प्रवाशांचा असा छळ होऊ शकतो का?”
Mumbaikars walking on railway tracks to reach their office due to failure of local train service.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 24, 2024
Just ask a simple question: Can you even imagine torture of citizens like this in any civilised country? pic.twitter.com/o1QM0XreM7
विवेक अग्निहोत्री यांनी यापूर्वी अतिवृष्टीनंतर अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ते ‘पर्व’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट महाभारतावर आधारित असल्याचं म्हटलं जातं आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये, निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता.