७६ वा ‘कान्स चित्रपट महोत्सव (Cannes Film Festival) १६ मे पासून सुरू झाला. हा जगातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. या महोत्सवात बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत अनेक कलाकार सहभागी होतात. १६ ते २७ मेपर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यंदा कान्स महोत्सवात पदार्पण करणार आहे. तसेच या महोत्सवात महिला आणि पुरुषांसाठी ड्रेसकोडही ठेवण्यात आला आहे.
‘कान्स’ चित्रपट महोत्सवात जगभरातील अनेक तारेतारका हजेरी लावत असतात. या महोत्सवाच्या तिकिटाची किंमतही लाखो रुपयांमध्ये आहे. या तिकिटांची किंमत ५ ते २० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या महोत्सवात वेगवेगळे सेलिब्रिटीज जे मोठमोठ्या ब्रँडचे डिजायनर कपडे परिधान करून येतात आणि त्यांच्या या स्टायलीश कपड्यांमुळेच हा महोत्सव सध्या चर्चेत आला आहे. नुकतंच ‘द काश्मिर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या महोत्सवातील फॅशनवर टिप्पणी केली आहे.
आणखी वाचा : ‘द केरला स्टोरी’मध्ये ‘आसिफा’ हे पात्र साकारणाऱ्या सोनिया बलानीला मिळतायत धमक्या; अभिनेत्री म्हणाली..
विवेक यांनी ट्वीटच्या माध्यमातून या महोत्सवाला फॅशन शोचा रॅम्प समजणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजची चांगलीच कानउघडणी केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये विवेक म्हणतात, “कान्स चित्रपट महोत्सव हा केवळ चित्रपटांसाठी आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? मी वेळीच आठवण करून देऊ इच्छितो की तो कोणताही फॅशन शो नाही.” विवेक अग्निहोत्री यांच्या ट्वीटवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या.
गेल्याच वर्षी आपल्या ‘सफेद’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कान्सला उपस्थिती लावलेल्या अभिनेत्री मीरा चोप्रानेही विवेक अग्निहोत्री यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. विवेक यांच्या ट्वीटला उत्तर देताना तिने लिहिलं, “हे फार दुर्दैवी आहे, मीसुद्धा हीच गोष्ट निदर्शनास आणून दिली जेव्हा मी गेल्यावर्षी तिथे गेले. तिथे केवळ एक फॅशन परेड सुरू होती. बॉलिवूडमध्ये केवळ तुम्ही काय परिधान केलं आहे याचीच चर्चा होते. इतर देशातील कलाकार मात्र तसा विचार करत नाहीत. आपल्या कलाकारांसारखे ते फॅशन आणि पीआरला एवढं महत्त्व देत नाहीत.”