२०२२ मध्ये आलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवरील नरसंहारावर बेतलेला होता. हा प्रोपगंडा चित्रपट असल्याचं म्हणत प्रचंड टीकाही झाली होती, पण तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. इतकंच नाही तर या चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ला ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यानंतर जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली. हसणाऱ्या इमोजीसह ‘राष्ट्रीय एकता’ असं लिहिलं. त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केल्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, “तुमच्याकडून मिळणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. तुम्ही आणखी वेगळी प्रतिक्रिया दिली असती, तर मी खूप निराश झालो असतो. पुन्हा एकदा धन्यवाद.”
मार्च २०२२ मध्ये रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला भाजपाचा पाठिंबा मिळाला होता. उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, गोवा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या सहा भाजपशासित राज्यांनी चित्रपट टॅक्स फ्री केला होता. चित्रपटाला ऑस्करसाठी नॉमिनेशनही मिळालं होतं.