‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री हे सामाजिक आणि राजकीय विषयांवर अनेकदा आपले मत मांडताना दिसतात. गेल्या अनेक दिवसांपासून ते बॉलीवूडवर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, काश्मिरी हिंदू नरसंहाराचं प्रकरण पुन्हा उघडण्याच्या भारत सरकारने केलेल्या घोषणेवर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सरन्यायाधिशांना एक विनंती केली आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी ‘गदर २’ पाहिल्यानंतर दिला रिव्ह्यू, त्यांना कसा वाटला चित्रपट? जाणून घ्या
आता विवेक अग्निहोत्री यांनी सरन्यायाधिश चंद्रचूड यांना हात जोडून विनंती केली आहे. सरन्यायाधिशांनी निवृत्त होण्यापूर्वी धर्माचे काम करावे, असं त्यांनी म्हटलं आहे. नीलकंठ गंजूवाला खटला पुन्हा उघडल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. “मी सरन्यायाधीश चंद्रचूड जी यांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी निवृत्त होण्यापूर्वी धर्माचे काम करावे. धर्माचे काम म्हणजे मी एखाद्या धर्माबद्दल बोलत नाही तर गीतेच्या धर्माबद्दल बोलत आहे. त्यांनी सत्यमेव जयतेचे काम करत जावे. हाच धर्म आहे ज्याद्वारे त्यांना मोक्ष आणि मुक्ती मिळेल आणि त्यांना ईश्वराचे आशीर्वाद मिळतील. काश्मीरमधील हिंदूंचा नरसंहार प्रकरणाची ते स्वतःहून दखल घेऊ शकतात.”
विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उघडण्यास नकार दिला होता. त्यांच्याकडे पुरावे नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. आता मी माननीय चंद्रचूड जींना विनंती करतो की जर त्यांना पुरावे पाहायचे असतील तर त्यांनी माझी ‘द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ सीरिज पाहावी. त्यातून त्यांना इतके पुरावे मिळतील की ते स्वतःहून त्याची दखल घेऊ शकतील.”
विवेक यांची आगामी वेब सीरिज ‘काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ ११ ऑगस्ट रोजी झी ५ वर रिलीज होत आहे. यापूर्वी त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बनवला होता. याशिवाय ते ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटावरही काम करत आहेत.