विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटापासूनच विवेक अग्निहोत्री हे कायम चर्चेत आहेत. चित्रपटाबरोबरच ते बॉलिवूडबद्दल अन् स्टार सिस्टमबद्दल परखडपणे भाष्य करतात.
चित्रपटसृष्टीतील राजकारण, घराणेशाही याबद्दलही विवेक यांनी बऱ्याचदा भाष्य केलं आहे. याबरोबरच ते राजकीय भूमिका घ्यायलाही पुढे मागे बघत नाहीत. यामुळे बऱ्याचदा त्यांच्यावर टीकाही झालेली आहे. गेल्या वर्षाचं चित्र पाहता विवेक अग्निहोत्री हे कायम प्रोपगंडा चित्रपट बनवतात असा आरोप बऱ्याचदा त्यांच्यावर केला गेला आहे. याउलट त्यांच्या या आगामी चित्रपटाकडे चित्रपटसृष्टी मुद्दाम कानाडोळा करत असल्याचं विवेक यांनी स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : शाहरुखच्या ‘जवान’पुढे विकी कौशलचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ पडला फिका; दुसऱ्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी
‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले, “माझा ‘बुद्धा इन अ ट्राफिक जाम’ हा चित्रपट आला तेव्हा यूट्यूबवर किमान १०० लोकांनी तरी त्याचं परीक्षण केलं. ‘द ताशकंत फाइल्स’ला मोठ्या प्रमाणावर प्रदर्शितच करता आलं नाही. तुम्ही इंटरनेटवर फक्त ‘जवान’ असं लिहा, तुम्हाला हजारो लोकांचे रिव्यू सापडतील. पण ‘द व्हॅक्सिन वॉर’सारखा एक महत्त्वाचा चित्रपट येत आहे, याची साधी कुणी दखलही घेत नाहीये.”
इतकंच नव्हे तर मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसनी तसेच बड्या स्टार्सनी विवेक यांच्याकडे ‘द काश्मीर फाइल्स’च्या सिक्वलचीही मागणी केलेलीअसल्याचं विवेक यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, “द काश्मीर फाईल्सच्या यशानंतर कित्येक मोठ्या स्टुडिओजनी मला २०० ते ३०० कोटींची ऑफर दिली, मोठमोठे स्टार्स माझ्या आगामी प्रोजेक्ट ‘द दिल्ली फाइल्स’मध्ये काम करण्यास इच्छुक असल्याचं मला समजलं. कित्येकांनी तर मला द काश्मीर फाइल्सचा सिक्वल काढायचीसुद्धा विनंती केली. पण मी त्यांच्या अमीषाला बळी पडलो नाही.”