विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात नाना पाटेकरांनी डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट स्वदेशी करोना लस निर्माण करण्याची गोष्ट सांगतो. या चित्रपटात नाना पाटेकरांना मुख्य भूमिकेत घेण्यास आपल्याला अनेकांनी मनाई केली होती, असं विवेक अग्निहोत्रींनी सांगितलं. तसेच नानांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत नानांनी विवेक अग्निहोत्रींनी चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी त्याच्याशी संपर्क कसा साधला याबाबत सांगितलं. तसेच फीबद्दल चर्चा केली त्याबद्दलही माहिती दिली. नाना म्हणाले, “जेव्हा तो हा चित्रपट घेऊन माझ्या गावात आला तेव्हा त्याने मला फीबद्दल विचारलं. मी त्याला माझी फी काय आहे हे सांगितल्यावर तो म्हणाला की तो इतके पैसे देऊ शकत नाही. त्याने मला सांगितलं की तो किती पैसे देऊ शकतो आणि मी ते मान्य केले. या चित्रपटासाठी मी माझ्या फीमध्ये ८० टक्के सूट दिली आहे. इरफान, ऋषी कपूर आणि ओम पुरी यांच्या निधनानंतर एक जागा रिकामी आहे. त्यामुळे लोकांना माझ्याबद्दल वाटतं की थोडा वेडा आहे पण त्याला घेऊ या. अनेकांनी विवेकला बजावले की मी यात काम केले तर चित्रपट पूर्ण होणार नाही.”
“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”
विवेक यांनी नाना पाटेकरांना चित्रपटात घेण्याचा अनुभव सांगितला. अनेकांनी आपल्याला नानाला चित्रपटात घेण्यापूर्वी सावध राहण्याचा इशारा दिला होता, असंही सांगितलं. “मला सर्वांनी म्हटलं की वेडा झाला आहेस का? काय करतोय तू? तो दिग्दर्शकांना मारतो. अनेक बड्या दिग्दर्शकांना याचा फटका बसला आहे यात शंका नाही. पण आम्ही सर्व कलाकारांची यादी तयार केली ज्यांनी भूमिका वाईट असतानाही उत्तम अभिनय केला आणि आम्ही नाना पाटेकर यांच्या नावावर येऊन थांबलो. सगळ्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे जाऊ नकोस कारण तो एक वेडा माणूस आहे जो दिग्दर्शकाच्या कामात खूप हस्तक्षेप करतो आणि तो स्वतःच चित्रपटाचे दिग्दर्शन करू पाहतो. पण माझा नानांवर विश्वास होता,” असं विवेक अग्निहोत्रींनी नमूद केलं.