दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. खासकरून ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडली आहे. विवेक हे बॉलिवूडबद्दल आणि एकूणच राजकीय परिस्थितीबद्दल परखडपणे आपली मतं सोशल मीडियावर मांडत असतात.
गेले काही दिवस ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील काही डिलीट केलेले सीन्स शेअर करत आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला, या चित्रपटाने तब्बल ३०० कोटीहून अधिक कमाई बॉक्स ऑफिसवर केली. या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मीरचा एक वेगळाच इतिहास समोर आला. मध्यंतरी ‘इफ्फी’मध्ये नदाव लॅपिड यांनी या चित्रपटावर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता.
नुकतंच एका पॉडकास्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी प्रथम भाष्य केलं, शिवाय ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर पुन्हा मसाला चित्रपटांकडे लोक वळतील असं भाकीतही त्यांनी केली. भारतीयांना मसाला चित्रपट का आवडतात हे सांगताना त्यांनी वेगवेगळ्या देशातील कलाकृतींची उदाहरणं दिली, यामध्ये त्यांनी युरोपियन, कोरिअन चित्रपटांबरोबरच पाकिस्तानमधील मनोरंजनसृष्टीचाही उल्लेख केला आहे. पाकिस्तानच्या मनोरंजन क्षेत्रात ‘ड्रामा’ ही गोष्ट ज्यापद्धतीने सादर केली जाते ती अद्याप भारतीय मनोरंजनसृष्टीला जमलेली नाही असंदेखील विवेक या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.
आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचाच डंका! ‘पठाण’नंतर पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘DDLJ’ने केली जबरदस्त कमाई
विवेक अग्निहोत्री म्हणाले, “युरोपियन चित्रपट घ्या, तिथल्या लोकांची मानसिकता वेगळी आहे. कोरियन चित्रपटांमध्ये ज्यापद्धतीने हिंसा आणि रक्तपात दाखवला जातो तसा भारतीय चित्रपटात दाखवला गेला तर खूप प्रॉब्लेम होईल ती त्यांची खासियत आहे, ते त्यांच्यासाठी मनोरंजन आहे. प्रत्येक देशातील प्रेक्षकांच्या मानसिकतेवर या गोष्टी अवलंबून असतात. याबरोबर ज्या पद्धतीचं नाट्य पाकिस्तानी टेलिव्हिजन कार्यक्रमात सादर केलं जातं, तसं नाट्य भारतात अद्याप कुणीच सादर करू शकलेलं नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा पहिले एकच देश होता, आपली संस्कृती, संगीत, कथा सादर करायची पद्धत, भाषा हे सगळं एक आहे. तरी त्यांचं नाट्य सादर करायची पद्धत वेगळी आहे, आपली पद्धत वेगळी आहे. तिथला समाज त्यापद्धतीच्या नाट्यमय कथांसाठी अधिक परिपक्व आहे.”
पुढे अग्निहोत्री म्हणाले, “याप्रमाणेच भारतात मसाला चित्रपट जास्त पसंत केले जातात, मलाही आवडतात. पण केवळ मसाला चित्रपट म्हणजे मनोरंजनविश्व हे समीकरण योग्य नाही, पठाणच्या यशामुळे हे समीकरण पुन्हा डोकं वर काढू लागलं आहे.” या पॉडकास्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. विवेक आता ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. या चित्रपटात नाना पाटेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.