निर्माती आणि अभिनेत्री पल्लवी जोशी या त्यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. या चित्रपटाचे शूटिंग सध्या हैदराबादमध्ये सुरू आहे. पण काल या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांचा अपघात झाला आणि त्यानंतर त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता त्यांचे पती विवेक अग्निहोत्री यांनी पल्लवी जोशी यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. पल्लवी जोशी यांचा सेटवर अपघात झाल्याचे कळताच नेटकऱ्यांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आणि त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना ही केली. आता त्या सगळ्यांचे आभार मानत विवेक अग्निहोत्री यांनी पल्लवी जोशी यांच्या प्रकृतीची माहिती शेअर केली आहे.
आणखी वाचा : अश्नीर ग्रोव्हरने घेतला उशिरा लग्न करण्याच्या तरुणांच्या निर्णयावर आक्षेप, म्हणाला, “लवकर लग्न केल्याने…”
विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्वीट करत लिहिलं, “पल्लवीच्या वतीने मी तिची काळजी व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. चित्रपटाचं शूटिंग करत असताना एक चार चाकी तिच्या पायावरून गेली. त्यामुळे तिच्या पायाचं हाड फ्रॅक्चर झालं आहे आणि ते बरं व्हायला अजून बराच वेळ लागणार आहे. पण अशा परिस्थितीतही आज ती शूटिंग करण्यासाठी सेटवर हजर झाली. शो मस्ट गो ऑन.”
‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी करत आहेत.