‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शकासह प्रमुख कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांनी बॉलीवूडमधील सद्यस्थिती आणि चित्रपटांबद्दल भाष्य केलं.
याबरोबरच मीडियाशी संवाद साधताना विवेक अग्निहोत्री अन् नाना पाटेकर यांनी एकमेकांबद्दल प्रथमच काम करण्याच्या अनुभवाबद्दल भाष्य केलं. नाना पाटेकर यांना चित्रपटात घेताना विवेक यांनाही बऱ्याच लोकांनी नाना यांच्या रागीट स्वभावाबद्दल सांगितलं होतं, इतकंच नव्हे तर नाना यांना चित्रपटा घेतल्याबद्दल त्यांना काहींनी मूर्खातसुद्धा काढल्याचं त्यांनी सांगितलं.
याविषयी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, “अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला कित्येकांनी सांगितलं की इतर कुणालाही घ्या पण नाना यांना चित्रपटात घेऊ नका. कारण जरा जरी त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर तुझी काही खैर नाही असं बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं. मी पल्लवीकडे याबाबतीत विचारणा केली तेव्हा मला समजलं की कामाच्या बाबतीत नाना इतका चोख कलाकार नाही.”
पुढे ते म्हणाले, “नाना पुण्याच्या पुढे खडकवासलाजवळच्या एका फार्म हाऊसमध्ये राहतात, मी तिथे गेलो, नाना यांनी आमच्यासाठी छान जेवण केलं होतं. त्यानंतर मी न राहवून नाना यांना विचारलं की तुम्ही मला ४-५ वेळा थोबडावून काढलं तरी चालेल पण मी जी भूमिका लिहिली आहे ती तुम्ही अगदी तशीच साकारणार ना, एवढंच मला जाणून घ्यायचं आहे. एक गोष्ट मी अभिमानाने सांगू इच्छितो की सेटवर नाना एक नवीन मुलाप्रमाणे वावरत होते. या भूमिकेसाठी नाना यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं पडद्यावर दिसून येत आहे.”
या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मध्यंतरी अभिनेता आर माधवन यानेदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं. भारताची पहिली स्वतःची लस बनवणाऱ्या असामान्य वैज्ञानिकांची ही असामान्य कथा २८ सप्टेंबर रोजी पडद्यावर उलगडणार आहे.