चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी अलीकडील बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याची कारणं सांगितली आहेत. मध्यमवर्गीय प्रेक्षक या चित्रपटांशी फारसे रिलेट करू शकत नाहीत आणि म्हणूनच चित्रपट लोकांना थिएटरमध्ये आणण्यात अपयशी ठरत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, प्रेक्षक ‘आळशी’ झाले आहेत त्यामुळेच ते सिनेमागृहात चित्रपट पाहत नाहीत, असा युक्तिवाद सुधीर मिश्रा यांनी केला.
सुधीर मिश्रा यांच्याबरोबरच्या ताज्या पॉडकास्टमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले, “चित्रपटसृष्टीत माझ्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात आला आहे. मध्यमवर्गीय लोकांमध्ये मला माझे समाधान मिळाले आहे आणि जेव्हा मी गृहिणींशी बोललो तेव्हा त्यांनी चित्रपटांमधील ओव्हर एक्सपोजर व व्हल्गर प्रदर्शनाचा उल्लेख केला. चित्रपट लोकांच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत म्हणून लोक चिडले आहेत.”
“राज्यात लव्ह-जिहादच्या घटना…”; केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं ‘द केरला स्टोरी’बद्दल वक्तव्य
विवेक अग्निहोत्री यांनी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’चे उदाहरण दिले आणि विचारले की चित्रपटात ज्या प्रकारचे तरुण दाखवले आहेत ते खरोखरच देशातील तरुण आहेत का? “मी हे द्वेष न करता म्हणतोय, पण ‘स्टुडंट ऑफ द इयर’ आणि त्यानंतरचे चित्रपट, फक्त त्या चित्रपटांमधील तरुण आणि देशातील रस्त्यांवरचे तरुण पाहा, चित्रपटांमध्ये दाखवलेली तरुणाई तुम्हाला सापडणार नाही. मी जेव्हा ‘दीवार’ पाहिला तेव्हा मी लगेचच त्याच्याशी कनेक्ट झालो, मी अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिलं आणि मला वाटलं, ‘अरे मलाही ही समस्या आहे.’ पण आजच्या चित्रपटांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. तुम्ही प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेचा अनादर का करत आहात?” असा प्रश्न अग्निहोत्रींनी चित्रपट निर्मात्यांना केला.
सुधीर मिश्रा यांनी प्रेक्षकांना आळशी म्हटल्यावर विवेक अग्निहोत्री यांनी युक्तिवाद केला, “बॉयकॉट बॉलिवूड खोटं नाही. प्रेक्षक आळशी झाले नाहीत. आजकाल जे चित्रपट बनत आहेत ते मला समजून घ्यायचे आहेत. या चित्रपटांचे प्रेक्षक कोण आहेत? ते कोणाच्या चिंतांबद्दल बोलत आहेत? आम्ही कुठे जात आहोत? अगदी मनमोहन देसाईंच्या चित्रपटांनीही मध्यमवर्गीय माणसाचे प्रश्न मांडले. पण आजच्या चित्रपटांमध्ये सामान्य माणूस कुठे आहे?”
विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, “मी आणि कंगना रणौत यांच्याशिवाय कोणीही हिंदी चित्रपटसृष्टीच्या पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. जर बॉलिवूडने काही चुकीचे केले असेल तर आम्हाला त्याबद्दल प्रश्न करण्याचा अधिकार आहे, किमान विचारवंत आणि उदारमतवाद्यांनी ते केले पाहिजे. सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी ज्या इंडस्ट्रीतून आपला उदरनिर्वाह होत आहे, त्यांना आधी प्रश्न विचारू नयेत का? कंगना आणि माझ्याशिवाय बॉलिवूडला कोणी प्रश्न विचारला? आणि जर मी इंडस्ट्रीच्या पद्धतींवर प्रश्न उपस्थित केला, तर मला यापासून का वेगळं केलं जावं?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, अलीकडच्या चित्रपटांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची मांडणी करणं बंद केलंय, त्यात वास्तव दाखवलं जात नसल्याने प्रेक्षक चित्रपटांकडे पाठ फिरवत असल्याचं मत विवेक अग्निहोत्री यांनी मांडलं.