Bollywood Actor Vivek Oberoi : ‘मस्ती’, ‘साथिया’ या चित्रपटांमुळे अभिनेता विवेक ओबेरॉय घराघरांत लोकप्रिय झाला. आजही त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बॉलीवूडमध्ये सहज सुंदर अभिनय करून विवेकने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. परंतु, त्यानंतर काही कारणास्तव त्याला रुपेरी पडद्यावर स्वत:ची फारशी चमक दाखवता आली नाही. नुकताच तो ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये झळकला होता. सध्या अभिनेता मनोरंजन विश्वापासून काहीसा दूर आहे. तो स्वत:चा व्यवसाय सांभाळून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. परंतु, व्यवसायमधली त्याची आवड अगदी बालपणापासूनची आहे. पैशांची बचत, पैसे साठवून खर्च कसा भागवायचा या सगळ्या गोष्टी वयाच्या दहाव्या वर्षी शिकलो असं विवेकने अलीकडेच ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
फक्त १० वर्षांचा असताना विवेकला त्याचे वडील सुरेश ओबेरॉय काही गोष्टी ( इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट, परफ्यूम ) आणून द्यायचे आणि त्या विकण्यास सांगायचे. त्यातला नफा विवेकला स्वत:कडे ठेवण्याची परवानगी होती. परंतु, त्या व्यतिरिक्त वस्तूची मूळ किंमत त्याला वडिलांना परत करावी लागायची. याबाबत विवेकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याने वडिलांबरोबरचा ‘तो’ सीन पाहून शर्मिला टागोर यांना मारली होती झापड; म्हणाला, “आजही जेव्हा मी…”
विवेक सांगतो, “उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की, ज्या दिवशी आमची शाळा संपायची त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी माझे वडील मला काही वस्तू आणून द्यायचे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, परफ्यूम आणि विविध प्रकारच्या अन्य सामग्रीचा समावेश असायचा. ते मला सांगायचे, “या सगळ्या वस्तू दोन हजार रुपयांच्या आहेत. तू यातल्या किती वस्तू विकू शकतोस?” समजा मी एकूण हजार रुपयांच्या वस्तू विकल्या तर मला वडिलांना ते हजार रुपये परत करावे लागायचे. त्यापेक्षा मला जास्त काही नफा मिळाला असेल, तर ते पैसे माझे असायचे आणि महत्त्वाचं म्हणजे मी तेव्हा फक्त १० वर्षांचा होतो.”
लहान वयातच पैशांची गुंतवणूक करू लागलो- विवेक ओबेरॉय
अभिनेता पुढे सांगतो, “वडिलांनी लावलेल्या या सवयीमुळे मला माझे पैसे मॅनेज करायची सवय लागली. तुम्ही सायकलवर वस्तू विकायला गेलात तर किती पैसे वाचतात? तुम्ही रिक्षातून प्रवास केला तर किती पैसे वाचतील? याचं सगळं गणित मी जुळवायचो. यामुळे मला एक शिस्त लागली. मी १५-१६ वर्षांचा होईपर्यंत मला वडील दरवर्षी अशाप्रकारे वस्तू विकण्यासाठी पाठवायचे. यामुळे मला पैशांची गुंतवणूक, आपण बँकेत पैसे साठवले पाहिजे या गोष्टी समजल्या.”
“ज्या वयात सगळी मुलं खेळ खेळतात त्या वयात व्यवहारज्ञान समजल्यामुळे मला पैशांचं गणित समजलं. मी माझ्या वडिलांमुळे माणूस म्हणून घडलो. त्यांनी लावलेल्या या शिस्तीमुळे वयाच्या १५ व्या वर्षापासून मी माझ्या बाबांकडून आशीर्वाद सोडून इतर काहीच घेतलं नाही.” असं विवेकने सांगितलं.
दरम्यान, विवेकने न्यूयॉर्कमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिथेच त्याने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. यानंतर राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ चित्रपटातून २००२ मध्ये त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पुढे, सलग काही चित्रपट फ्लॉप झाल्यावर विवेकला त्याचं व्यवहारज्ञान कामी आलं. अनेक कंपन्यांमध्ये आधीच गुंतवणूक केल्यामुळे त्याने स्वत:ची कंपनी उघडली व एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. सध्या व्यवसाय सांभाळून तो अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. आता तो लवकरच ‘मस्ती ४’ चित्रपटात झळकणार आहे.