राणी मुखर्जी आणि विवेक ओबेरॉय यांची जोडी तब्बल २१ वर्षांपूर्वी ‘साथिया’ चित्रपटाच्या निमित्ताने जमली होती. राणीचे सलग काही चित्रपट फ्लॉप ठरल्याने विवेकबरोबरचा ‘साथिया’ तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या दोघांच्याही अभिनयाचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं. परंतु, प्रत्यक्षात या चित्रपटाचं शूटिंग करताना विवेकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. याविषयी त्याने नुकत्याच ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माने विवेकला हा चित्रपट करू नकोस असा सल्ला दिला होता. याविषयी सांगताना अभिनेता म्हणाला, “साथिया चित्रपट करून नकोस असा सल्ला मला प्रत्येकाने दिला. ‘तू ॲक्शन हिरो आहेस…प्रेमकथेत काम कसा करणार?’ असं सगळेजण बोलत होते. माझे गुरू राम गोपाल वर्मा देखील माझ्यावर संतापले होते. पण, त्यांच्याकडून परवानगी मागण्यापेक्षा, त्यांची क्षमा मागून हा चित्रपट करेन असं मी ठरवलं होतं. मला चित्रपटाची कथा खूपच आवडली होती. ‘साथिया’चा दिग्दर्शक शाद अली माझा शाळकरी मित्र आहे. सुरुवातीला तो अभिषेकबरोबर चित्रपट बनवत होता परंतु, ते काही कारणास्तव शक्य झालं नाही.”

हेही वाचा : Video : तितीक्षा-सिद्धार्थची लगीनघाई! हळदी समारंभात नवरदेवाचा वडिलांबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

विवेक पुढे म्हणाला, “शादने मला त्याच्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी आम्ही मणिरत्नमचा ‘आलापयुथे’ हा मूळ चित्रपट पाहिला. याच चित्रपटावर ‘साथिया’ आधारित आहे. तो चित्रपट पाहताना मी शादबरोबर काम करायचं ठरवलं. रेल्वे स्टेशनला शूटिंग करताना मी तिथेच बेंचवर झोपायचो कारण, तेव्हा आमच्याकडे बजेट नव्हतं. मला कोणीही ओळखत नव्हतं. माझ्याकडे मेकअप/व्हॅनिटी व्हॅन नसल्याने मी रेस्टॉरंटच्या स्वच्छतागृहात कपडे बदलायचो. आम्हाला एका दिवसात चार सीन शूट करायचे होते. त्यामुळे दिवसाला १८ ते २० तास मी काम केलं.”

हेही वाचा : तितीक्षा तावडे – सिद्धार्थ बोडके यांनी गुपचूप उरकला साखरपुडा, समारंभातील पहिला फोटो आला समोर

“चित्रीकरण सुरू असताना आम्ही अनेकदा शूटिंगसाठी स्वत:चं सामान घेऊन जायचो. अशातच माझा पहिला चित्रपट ‘कंपनी’ प्रदर्शित झाला आणि माझं आयुष्य रातोरात बदलून गेलं. एकदा मला पाहण्यासाठी सेटवर हजारोंची गर्दी जमा झाली होती. ‘कंपनी’मध्ये माझ्या पात्राचं नाव ‘चंदू भाई’ असं ठेवण्यात आलं होतं. ‘कंपनी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अचानक हजारो माणसं सेटवर आली आणि ‘चंदू भाई’ असा आवाज देऊ लागली. सगळे लोक एवढे उत्साहात होते की, शेवटी पोलीस आले त्यांनी मला गाडीतून बाहेर नेलं. त्या दिवसानंतर संपूर्ण आयुष्य बदललं. मला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.” असं विवेक ओबेरॉयने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek oberoi recalls changing clothes in restaurant washrooms sleeping on benches during saathiya shoot sva 00
Show comments