Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने त्याच्या २२ वर्षांच्या बॉलीवूड करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण, वैयक्तिक आयुष्यात त्याला व्यवसाय क्षेत्रात जास्त यश मिळालं. २००२ मध्ये ‘कंपनी’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केल्यावर अभिनेता घराघरांत लोकप्रिय झाला. यानंतर साथिया, मस्ती, ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ अशा चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. बॉलीवूडचा चॉकलेटबॉय म्हणून विवेकला ओळखलं जायचं. मात्र, नुकत्याच ‘फ्रँचायझी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने बॉलीवूडबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
विवेक ( Vivek Oberoi ) सांगतो वाढदिवसाला तुम्हाला येणाऱ्या पुष्पगुच्छांच्या संख्येवरून तुमच्या यशाचं मोजमाप केलं जातं. अभिनेता याबद्दल म्हणाला, “जर तुम्ही इंडस्ट्रीत चांगलं काम करत असाल, तर तुमच्या वाढदिवसाला निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार यांच्याकडून असंख्य पुष्पगुच्छ पाठवले जातात. एवढे की घरात ती फुलं ठेवायला तुम्हाला जागा नसते. पण, जेव्हा तुमचे चित्रपट चालत नाहीत तेव्हा त्याच पुष्पगुच्छांची संख्या कमी होऊ लागते आणि मग आपल्याला जाणवू लागतं अरे मी आता चांगलं काम करत नाहीये ना?”
विवेक पुढे म्हणाला, “आज मला माझ्या व्यवसायामुळे स्वत:वर एवढा विश्वास आहे की, माझं घर चालवण्यासाठी, EMI भरण्यासाठी मला स्क्रिप्ट न आवडणारे, ज्या चित्रपटांवर मला विश्वास नाही, असे सिनेमे मला स्वीकारावे लागत नाहीयेत. पण, जेव्हा घर चालवायचं होतं, EMI चं ओझं होतं तेव्हा असे सिनेमे मी केले आहेत.”
बॉलीवूडच्या कारकिर्दीत विवेक ओबेरॉयने ( Vivek Oberoi ) अनेक चढउतार अनुभवले. २००२ मध्ये ‘कंपनी’नंतर विवेकने लगेच ‘साथिया’, ‘युवा’मध्ये काम केलं. यामुळे त्याचं करिअर एकदम व्यवस्थित सुरू होतं. पण, त्यानंतर सलमान खानबरोबरची भांडणं, बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेलेले काही चित्रपट यामुळे बॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातून विवेक बाहेर ढकलला गेला. पण, यानंतर त्याच्याकडे १५ महिने कामंही नव्हतं. पण, अशा परिस्थितीत विवेकने व्यवसाय करून घर चालवलं होतं.
दरम्यान, आता हळुहळू विवेक ( Vivek Oberoi ) पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये सक्रिय होऊ लागला आहे. ‘इनसाइड एज’, ‘इंडियन पोलीस फोर्स’ अशा सीरिजमध्ये तो झळकला होता. याशिवाय येत्या काळात तो लवकरच ‘मस्ती ४’मध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.