अभिनेता विवेक ओबेरॉयने ‘साथियां’, ‘कंपनी’, ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ या सिनेमांतून त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. तर ‘मस्ती’ सिनेमाच्या विविध भागांतून कॉमेडी करीत तो या आशयातही छान काम करू शकतो हे त्याने प्रेक्षकांना दाखवून दिले. अभिनेता विवेक ओबेरॉयने अलीकडेच त्याच्या कारकिर्दीतील संघर्ष आणि अनुभवांवर प्रकाश टाकला. सुरुवातीच्या काळात त्याच्या वडिलांनी त्याला लाँच करण्यासाठी तयार करत असलेल्या चित्रपटाला त्याने दिलेला नकार, नंतर स्वतः चित्रपट मिळवण्यासाठी केलेली मेहनत आणि पहिलाच सिनेमा मिळविण्यासाठी झोपडपट्टीत केलेले वास्तव्य या सर्वांवर त्याने प्रकाश टाकला आहे.
वडिलांच्या प्रस्तावाला नकार
‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचा प्रसंग शेअर केला. त्याच्या वडिलांनी त्याला बॉलीवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी एक चित्रपट तयार करायचा असे ठरवले होते. त्या चित्रपटाला विवेकने नकार दिला. त्याला स्वतःच्या बळावर बॉलीवूड मध्ये काम मिळवायचे होते. याच विषयावर विवेक म्हणाला, “मी ती संधी सोडून दिली आणि त्यानंतर १८ महिने संघर्ष केला. त्या काळात खूप नकार पचवावे लागले, पण मला माझ्या त्या निर्णयाचा अभिमान आहे.”
हेही वाचा…Pushpa 2 Vs Interstellar वादात जान्हवी कपूरने घेतली उडी; कमेंट करत म्हणाली, “तुम्ही पाश्चिमात्य…”
‘कंपनी’ सिनेमासाठी तीन आठवडे केले झोपडपट्टीत वास्तव्य
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंपनी’ या चित्रपटासाठी विवेकची सहजरीत्या निवड झाली नव्हती. सुरुवातीला राम गोपाल वर्माने विवेकला या भूमिकेसाठी नकार दिला होता. कारण- विवेक तेव्हा खूपच सुशिक्षित आणि सुसंस्कृत दिसायचा. त्याचा हा लूक राम गोपाल वर्माला सिनेमातील ‘चंदू’ या भूमिकेशी सुसंगत वाटला नाही. मात्र, विवेकने ही भूमिका मिळवायचीच, असा निश्चय केला आणि त्यासाठी तो वेगळ्या पद्धतीने तयारीला लागला.
राम गोपाल वर्माची भेट घेण्यासाठी तीन आठवड्यांची वाट पाहावी लागेल, असे कळल्यावर विवेक घरी परतला नाही. त्याऐवजी त्याने राम गोपाल वर्माच्या ऑफिसजवळील झोपडपट्टीत एक खोली भाड्याने घेतली आणि तीन आठवडे तिथे राहून स्थानिक लोकांचे निरीक्षण केले. विवेक म्हणाला “मी त्यांच्या बोलण्याचा आणि वागण्याचा बारकाईने अभ्यास केला,”
हेही वाचा…आमिर खानने अनेक वर्षानंतर लावली अवॉर्ड शोला हजेरी, मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार
अंतिम ऑडिशनसाठी अस्सल चंदूचा अवतार
आपल्या पात्रात पूर्णपणे समरस होण्यासाठी विवेकने जुनी चप्पल, फाटकी बनियान, ढगळी पँट आणि हातात विडी घेऊन राम गोपाल वर्माच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्याने दार उघडून आपले फोटो टेबलावर फेकले आणि चंदूचा आत्मविश्वास दाखवीत ऑडिशन दिले. त्याच्या दमदार सादरीकरणाने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा इतके प्रभावित झाले की, त्यांनी लगेचच त्याला भूमिका ऑफर केली.
‘कंपनी’मधील या भूमिकेमुळे विवेक ओबेरॉयचे कौतुक झाले आणि त्याला इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण करता आले. त्याच्या मते, हा प्रवास जरी कठीण असला तरीही तो अनुभव त्याच्यासाठी खूप मोलाचा ठरला.