बॉलीवूडच्या कलाकारांची अनेकदा विविध कारणांमुळे चर्चा होताना दिसते. कधी ते त्यांच्या चित्रपटातील अभिनयामुळे चर्चेत असतात, कधी त्यांच्या आगामी काळातील प्रोजेक्टमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी शेअर केलेले फोटो, व्हिडीओ चर्चांचा भाग बनतात. तर अनेकदा या कलाकारांनी मुलाखतीत केलेली वक्तव्ये चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय(Vivek Oberoi) त्याने नुकत्याच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यांमुळे तो चर्चेत आला आहे.
काय म्हणाला अभिनेता?
अभिनेता विवेक ओबेरॉयने नुकतीच डॉक्टर जय मदान यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने म्हटले, “माझ्या करिअरमध्ये मी असा एक संघर्षाचा काळ अनुभवला, ज्यावेळी मला आर्थिक ताण सहन करावा लागला. मी खूप तणावात होतो. मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे. मी माझ्या आयुष्यात असे कधी अनुभवले नव्हते. हे सगळे एकत्र घडले.”
सलमान खानबरोबर त्याने जे भांडण सुरू केले होते, त्यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “तो एक भावनिक प्रतिसाद होता. मी खूप लहान होतो. माझ्या कृत्यांचे परिणाम मला खूप उशिरा समजले. मी केलेल्या गोष्टींच्या परिणामांना सामोरे जाण्यास मी तयार होतो. पण, ज्यावेळी माझ्या आई-वडिलांना धमकावले गेले, त्यावेळी मला त्रास झाला. माझे आई-वडील फोन उचलायचे तेव्हा त्यांना धमकावले जायचे. मला माझ्या बहिणींसाठी भीती वाटत होती. सुरुवातीला आम्ही विचार केला की, हे प्रँक कॉल आहेत. पण, नंतर पोलिसांकडून समजले की, त्या धमक्या खऱ्या होत्या.”
विवेकला काय धमकी मिळाली होती, याबद्दल त्याने कोणतेही वक्तव्य केले नाही. याबद्दल अधिक बोलताना पुढे त्याने म्हटले, “मी माझ्या रिलेशनशिपच्या कठीण टप्प्यातून गेलो.” यावर त्याला विचारले की, जेव्हा तू कठीण काळातून जात होतास, त्यावेळी तुला इंडस्ट्रीने काही मदत केली का? त्यावर बोलताना त्याने म्हटले, “अनेक लोकांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांचा पाठिंबा दाखवला. लोकांनी काहीही केलं तरी मी लोकांचं कौतुक करणं पसंत करतो. दु:खाचं मूळ कारण हे अपेक्षा आहे.”
दरम्यान, विवेक ओबेरॉय हा अभिनयाबरोबरच त्याच्या उद्योग-व्यवसायासाठीदेखील ओळखला जातो. उद्योग जगतात त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd