Vivek Oberoi : विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या व्यवसायामुळे सर्वत्र चर्चेत आहे. बॉलीवूड सिनेविश्वापासून दूर होऊन त्याने व्यवसाय करण्यास प्राधान्य दिलं आणि आजच्या घडीला तो जगातील यशस्वी व्यावसायिकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच विवेक मुंबई सोडून कायमचा दुबईला शिफ्ट झाला आहे. पण, तरीही तो भारतात येऊन-जाऊन असतो.
आपल्या फिल्मी करिअमध्ये त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता पण, हेच सिनेमे पुढे जाऊन बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते. यामध्ये ‘हम तुम’, ‘मुन्नाभाई MBBS’, ‘ओम शांती ओम’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. याबद्दल विवेकने ‘मेन एक्सपी’ला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणाने संवाद साधला आहे. तसेच ‘साथिया’मध्ये शाहरुखने केलेल्या कॅमिओबद्दल देखील विवेकने आपलं मत मांडलं आहे.
विवेक ओबेरॉयचा खुलासा
विवेक ओबेरॉयला ( Vivek Oberoi ) शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटात खलनायकाची भूमिका ऑफर झाली होती. पण, त्याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ चित्रपटात विवेकने गँगस्टरची भूमिका साकारली होती. याबद्दल अभिनेता जवळपास १७ वर्षांनी व्यक्त झाला आहे. तो म्हणाला, “खरंतर दोन्ही चित्रपटातल्या माझ्या भूमिका या नकारात्मक पात्राच्या होत्या आणि आमच्या शूटिंगच्या तारखा सुद्धा क्लॅश होत होत्या. ज्यावेळी फराहने मला भूमिकेसाठी ऑफर दिली, तोवर मी माझ्या ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ सिनेमातील व्यक्तिरेखेसाठी अभ्यास करायला सुरुवात केली होती. क्राइम डायरीज वाचल्या होत्या, पोलिसांना भेटलो होतो… त्या रोलसाठी मी ४ ते ५ महिने आधीच तयारी सुरू केली होती. मग, त्या क्षणाला सगळ्या गोष्टी अगदी झटपट बदलणं शक्य झालं नसतं. पण, मला आनंद आहे की, अर्जुनने रामपालने ती भूमिका अत्यंत उत्तमप्रकारे साकारली आहे.”
विवेक ( Vivek Oberoi ) पुढे म्हणाला, “दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगच्या तारखा वेगळ्या असत्या, तर नक्कीच मी फराहचा चित्रपट स्वीकारला असता, होकार कळवला असता. ‘ओम शांती ओम’च्या निमित्ताने आणखी गोष्ट घडली असती, ती म्हणजे मला शाहभाईंबरोबर ( शाहरुख खान ) काम देखील मला करता असतं. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला त्यांच्याबरोबर फक्त ‘साथिया’च्या निमित्ताने काम करण्याची संधी मिळाली होती. त्या चित्रपटात शाहभाईंनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.”
दरम्यान, फराह खानच्या ‘ओम शांती ओम’बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि अर्जुन रामपाल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर दुसरीकडे, ‘साथिया’चं दिग्दर्शन शाद अली यांनी केलं होतं आणि त्यात विवेक ओबेरॉय ( Vivek Oberoi ) आणि राणी मुखर्जी यांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या.