‘मस्ती’, ‘ग्रँड मस्ती’, ‘साथिया’ या चित्रपटांची नाव जरी घेतली तरी डोळ्यासमोर विवेक ओबेरॉयचं नाव येतं. बॉलीवूडमध्ये एन्ट्री केल्यावर त्याने अल्पावधीतच आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली. परंतु, इंडस्ट्रीत काम करताना विवेकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. एक वेळ अशी आली, जेव्हा विवेकला सगळं सोडून व्यवसायावर आपलं लक्ष केंद्रीत करावं लागलं. याबद्दल नुकत्याच एबीपी लाइव्हला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विवेक म्हणाला, “खरंतर, व्यवसाय मी फार वर्षांपूर्वी सुरू केला होता. वयाच्या १५ व्या वर्षी मी माझा स्वत:चा व्यवसाय चालू केला होता. याचं कारण माझं संपूर्ण शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये पूर्ण झालं होतं. पुढे, शालेय शिक्षण झाल्यावर मी ‘मिठीबाई कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. अर्थात, तेव्हा कॉलेजमध्ये पहिल्यांदाच मी सुंदर मुली पाहिल्या. त्यांना मला डेटवर घेऊन जायचं होतं. त्यावेळी माझे बाबा महिन्याला मला पाचशे रुपये संपूर्ण महिन्याभराच्या खर्चासाठी द्यायचे. पण, माझे ते पाचशे रुपये एकाच दिवशी संपले. त्यावेळी माझे वडील देखील मला ओरडले होते. त्यांनी मला अधिक जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला होता. यामुळे माझा अहंकार दुखावला गेला आणि माझा खर्च मी बघेन असं मी त्यांना सांगितलं होतं. कॉलेजमध्ये जाण्यासाठी, चहा प्यायला आणि रिक्षाने प्रवासासाठी मला पैशांची गरज होती. त्यावेळी मी काम करायचं ठरवलं. एका शोसाठी सूत्रसंचालन केलं तिथून थोडं मानधन मिळालं.”

हेही वाचा : “वन टू का फोर…”, अंबानींच्या समारंभात दुमदुमला मराठमोळ्या गायकाचा आवाज! सोबतीला होता रणवीर सिंह, पाहा व्हिडीओ

विवेक पुढे म्हणाला, “पुढे काही वर्षांनी मी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू लागलो, त्यासाठी मी ब्रोकर्सकडे प्रशिक्षण घेतलं होतं. बंगळुरुच्या व्हाईटफिल्डमध्ये मी पहिल्यांदा माझा व्यवसाय सुरू केला तेव्हा मी १९ वर्षांचा होतो. त्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी मी या व्यवसायातून माझा हिस्सा विकला आणि पुढील अभ्यासासाठी न्यूयॉर्कला गेलो. गुंतवणूकदार म्हणून मी या क्षेत्रात सुरुवात केली होती. पण, त्यानंतर मी एक सक्रिय व्यापारी झालो. न्यूयॉर्कवरून भारतात परतल्यावर मी अभिनेता झालो होतो, कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरुच होती पण ‘साथिया’सारख्या चित्रपटाने मला लोकप्रियता देखील मिळाली.”

बॉलीवूडबद्दल विवेकने केलं भाष्य

बॉलीवूडमधल्या संघर्षाबद्दल सांगताना विवेक म्हणाला, “चित्रपट समीक्षकांनी मी साकारलेल्या भूमिकांचं कौतुक केलं तरीही, एक काळ असा होता जेव्हा निर्माते मला काम देत नव्हते. माझ्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. एक यशस्वी अभिनेता होऊनही मला काम करण्यात अडचणी येऊ लागल्या. कोणत्याही चित्रपटाची ऑफर मिळत नव्हती. तेव्हा खरंच एक वेगळं दडपण मला आलं होतं. या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या व्यवसायामुळे मी सावरलो. व्यवसायातून कमावलेल्या पैशांतून मी माझं घर चालवत होतो. त्याच पैशांतून मी आमची धर्मदाय संस्था चालवली. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून तिकडे मिळालेल्या मानधनातून मी माझ्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले होते.”

हेही वाचा : ना सेल्फी, ना फोटो…; रितेश देशमुखच्या मुलांनी घेतला सुनील गावसकरांचा ऑटोग्राफ! म्हणाला, “माझी मुलं…”

“माझं अभिनय क्षेत्रातील करिअर धोक्यात असताना मला व्यवसायामुळे सावरता आलं. आतापर्यंत मी २९ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यावेळी मी वृंदावनमध्ये एक शाळा चालवत होतो, कॅन्सरच्या रुग्णांना मदत करत होतो, त्यामुळे जेव्हा मला अभिनय क्षेत्रात काम मिळत नव्हतं, भूमिका मिळणं बंद झालं तेव्हा मला माहीत होतं…माझ्या या सामाजिक कार्यावर या सगळ्याचा परिणाम होईल. त्यामुळे मी स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केलं. मी कधीही कोणाकडूनही पैसे मागितले नाहीत, माझ्या वडिलांना पैशांबद्दल कधीच विचारलं नाही. कोणाकडून मदत मागण्यापेक्षा मी सक्रियपणे व्यवसाय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. रिअल इस्टेटमध्ये आलो, काही कंपन्या स्थापन केल्या, काही तांत्रिक क्षेत्राशी संबंधित कंपन्या खूप मोठ्या झाल्या. आज मी जवळपास २९ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.” असं विवेक ओबेरॉयने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना सांगितलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business recalls struggle period sva 00
Show comments