एमएक्स प्लेअरच्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजमधून बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय पुन्हा चर्चेत आला आहे. मधली काही वर्षं बॉलिवूडपासून दूर फेकल्या गेलेल्या विवेकने पुन्हा चित्रपटसृष्टीत जम बसवायला सुरुवात केली आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये विवेकने त्याच्या एकंदर बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. शिवाय बॉलिवूडमधल्या मोठ्या लोकांनी विवेकचं करिअर उद्ध्वस्त करायचादेखील प्रयत्न केला होता त्याबद्दल वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘साथीया’, ‘कंपनी’सारखे लागोपाठ हीट चित्रपट देणाऱ्या विवेक ओबेरॉयला बॉलिवूडमधून बरंच लांब फेकण्यात आलं होतं. ऐश्वर्या रायशी त्याची जवळीक आणि तेव्हाच्या ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंड आणि सुपरस्टार सलमान खानशी त्याची झालेली वादावादी हे प्रकरण तेव्हा चांगलंच चर्चेत आलं होतं. विवेकने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सलमानच्या गैरवर्तणूकीबद्दल वक्तव्य केलं होतं. यानंतर विवेकच्या करिअरला उतरती कळा लागली आणि मग थेट ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’मधून विवेकने पुन्हा कमबॅक केलं.

आणखी वाचा : Vivek Agnihotri Vs Anurag Kashyap: दोन आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये Twitter War; एकमेकांवर सडकून टीका

या खडतर प्रवासात विवेक आणि त्याच्या कुटुंबाने बऱ्याच गोष्टी सहन केल्या. याविषयी बोलताना तो म्हणाला, “माझ्या कुटुंबाला माझा अभिमान आहे, कारण मी ज्या खडतर समस्यांचा सामना केला आहे ते त्यांनी फार जवळून पाहिलं आहे. जेव्हा चित्रपटसृष्टीतील बरीच मोठी आणि शक्तिशाली मंडळी माझे पाय खेचू पाहत होते, माझं करीअर उद्ध्वस्त करू पाहत होते तेव्हा मी ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’सारखा चित्रपट देऊन माझ्या कामातून त्यांना उत्तर दिलं. लोकांनी माझी खूप प्रशंसा केली, पण त्यानंतर तब्बल दीड वर्षं माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मी अभिनेता म्हणून यशस्वी होतो, चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला होता, समीक्षकांनीही प्रशंसा केली होती तरी माझ्याकडे काम नव्हतं.”

यातूनही विवेक बाहेर आला आणि त्याने वेगवेगळे चित्रपट आणि भूमिका केल्या ज्या लोकांनी पसंत केल्या. याविषयी बोलताना विवेक म्हणाला, “झालं गेलं गंगेला मिळालं. माझ्या मनात त्याविषयी काहीच राग नाही. आज ओटीटीसारखी सुवर्णसंधी हातात असताना मला आता फक्त माझ्यासाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी काम करायचे आहे.” विवेकच्या ‘धारावी बँक’ या सीरिजमधील भूमिकेचं लोकांनी खूप कौतुक केलं आहे. यात विवेकबरोबरच सुनील शेट्टीदेखील मुख्य भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek oberoi says most powerful people from bollywood literally sabotaged his career avn