संदीप वांगा रेड्डीने दिग्दर्शित केलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट अजूनही चर्चेत आहे. या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. अनेकांनी या चित्रपटावर टीकाही केली तर काही जणांनी याची प्रचंड स्तुती केली. बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई करत धुडगूस घातला आहे. चित्रपटात अॅक्शन सीन, इंटिमेट सीन तसेच काही वादग्रस्त सीन्सही आहेत. एकूणच चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटून गेला तरी याची चर्चा अजूनही सुरू आहे.
नुकतंच बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यानेदेखील या चित्रपटाच्या निमित्ताने यातील मुख्य अभिनेता रणबीर कपूरची प्रशंसा केली आहे. इतकंच नव्हे तर रणबीर हा आपल्यासारखाच आहे असंही भाष्य विवेक ओबेरॉयने केलं आहे. रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’मध्ये विवेकचे वडील व ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनीदेखील एक छोटीशी भूमिका निभावली होती.
आणखी वाचा : “माझी प्रिय शूरा…” पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आरबाज खानची रोमँटिक पोस्ट; म्हणाला, “मला म्हातारपणापर्यंत…”
विवेक ओबेरॉयने नुकतीच ‘अॅनिमल’च्या सक्सेस पार्टीमध्ये हजेरी लावली. या पार्टीमध्ये विवेक त्याचे वडील सुरेश ओबेरॉय यांच्यासह हजर होता. त्यावेळी रणबीरने तिथे उपस्थिती लावली अन् विवेकला पाहताच त्याला आलिंगन दिले. रणबीरच्या या कृतीमुळे विवेक चांगलाच भारावून गेला. रणबीर एक उत्तम नट तर आहेच पण तो आपल्यासारखाच आहे, त्याच्या मनात कसलीही भीती नाहीये, असं भाष्य विवेकने केलं.
‘मिरची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक ओबेरॉयने याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, “मी जेव्हा रणबीरचा असा परफॉर्मन्स पाहिला तेव्हा मी चकीतच झालो, हा तोच नट आहे ज्याने ‘ब्रह्मास्त्र’मध्ये काम केलं आहे. हा तोच नट आहे ज्याने आजवर विविधांगी भूमिका केल्या आहेत. मी जेव्हा रणबीरला ‘अॅनिमल’च्या सक्सेस पार्टीत भेटलो तेव्हा मी त्याला कडकडून मिठी मारली अन् त्याचं कौतुक केलं. त्याच्या पिढीतील तो सर्वोत्तम अभिनेता आहे, तो एकदाम बिनधास्त आहे, तो माझ्यासारखाच आहे, त्याला कसलीही भीती किंवा त्याच्या मनात कसलीच असुरक्षितता नाही.”
विवेक ओबेरॉयही त्याच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या रोहित शेट्टीच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतीच ही सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये विवेक ओबेरॉयसह सिद्धार्थ मल्होत्रा व शिल्पा शेट्टी हेदेखील चर्चेत आहेत.