Vivek Oberoi : विवेक ओबेरॉय बॉलीवूडचा असा एक अभिनेता ज्याला त्याच्या २२ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. २००२ मध्ये त्याने मनोरंजनविश्वात पदार्पण केलं होतं. मात्र, चित्रपटसृष्टीत फारसं यश मिळालं नसलं, तरीही आजच्या घडीला विवेक ओबेरॉय कोट्यवधींचा मालक आहे. अभिनेत्यावर एक वेळ अशी आलेली की, त्याला संपूर्ण चित्रपटसृष्टीतून बॉयकॉट केलं होतं. जवळपास १५ महिने कामंही नव्हतं अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढत विवेकने स्वत:चा व्यवसाय सुरु केला.
बॉलीवूडमधून बहिष्कार टाकल्यावर त्याने हार न मानता स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्याच्या बिझनेसमध्ये विवेकला भरघोस यश मिळालं. नुकत्याच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्याने बिझनेसबद्दल त्याचं मत मांडलं आहे. देशभरात व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय वर्षानुवर्षे सुरू असून, काही लोक बँकांव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर सुद्धा व्याजावर पैसे देतात. ( या कामासाठी लायसन्स किंवा परवान्याची गरज असते, परवान्याशिवाय व्याजावर पैसे देणे बेकायदेशीर असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँका आणि NBFC यांना बँकिंग परवाना दिला जातो ) विवेकने सर्वात आधी सावकारी व्यवसाय शून्य व्याजदर आकारून सुरू केला होता. विवेकने सांगितलं की, यातून त्याला मोठा नफा झाला, कारण त्या कंपनीचं मूल्य आताच्या घडीला सुमारे ३ हजार ४०० कोटींच्या घरात आहे.
हेही वाचा : रेश्मा शिंदेचा पती पवन काय काम करतो? अभिनेत्रीसाठी घेतलाय भारतात परतण्याचा निर्णय; म्हणाली, “युकेमध्ये तो…”
विवेकने सांगितला बिझनेस प्लॅन
विवेकचा व्यवसायाबाबत मार्गदर्शन करतानाचा व्हिडीओ फ्रँचायझी इंडिया या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आलाय यात अभिनेता म्हणतो, “मी शैक्षणिक कर्जावर आधारित स्टार्टअप सुरू केला होता. हा स्टार्टअप खूप मोठा झाला. कालांतराने आम्ही B2B नेटवर्कद्वारे १२ हजार शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचलो. पण, त्यानंतर आम्ही ग्राहकांशी स्वत: संपर्क साधून सर्व डेटा आमच्याकडे ठेवला. यामुळे, आमच्या जवळपास ४५ लाख ग्राहकांची माहिती आम्हाला थेट मिळू लागली. यामुळे आम्हाला मोठा फायदा झाला आणि कंपनीचं मूल्य जवळपास ४०० दशलक्ष (सुमारे ३ हजार ४०० कोटी रुपये) झालं.”
विवेक पुढे म्हणाला, “आमच्या ब्रँडने तयार केलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावकारी व्यवसाय. एखाद्या कर्ज देणाऱ्या कंपनीसाठी शून्य व्याजदाराने मनी-लेन्डिंग बिझनेस प्लॅन तयार करणं ही एक मोठी गोष्ट आहे. पण, आमची योजना खूप चांगली वर्कआऊट झाली आणि कंपनीला भरपूर यश मिळालं.”
दरम्यान, काही दिवसांआधी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा विवेकने व्यवसाय करणं हा माझा कायम ‘प्लॅन बी’ होता असं सांगितलं होतं. व्यवसायाचं पाठबळ असल्याने बॉलीवूडच्या लॉबीतून बाहेर पडून सहज त्याकाळी उदरनिर्वाह करणं शक्य झाल्याचंही विवेकने सांगितलं होतं.