69th National Film Awards: ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे करण्यात आली होती. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. दिल्लीत सुरू असणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
वहिदा रेहमान या जेव्हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आल्या तेव्हा त्या फार भावुक झाल्याचंही स्पष्ट पणे दिसत होतं. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “आदरणीय मंत्री अनुराग ठाकूर व साऱ्या ज्यूरी मेंबर्सचे मी मनापासून आभार मानू इच्छिते. ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आज मी जिथे पोहोचले आहे याचं सर्व श्रेय माझ्या लाडक्या चित्रपटसृष्टीला जातं.”
आणखी वाचा : Video : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला लग्नातील साडी नेसून पोहोचली आलिया भट्ट, पाहा व्हिडीओ
पुढे त्या म्हणाल्या, “नशिबाने मला सर्वोत्तम दिग्दर्शक, निर्माते, फिल्ममेकर्स, संगीत दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक या सगळ्यांचा आधार आणि मार्गदर्शन मिळालं. याबरोबरच मेक-अप आर्टिस्ट, वेशभूषाकार यांचाही यात सिंहाचा वाटा असतो. त्यामुळेच हा पुरस्कार मी या चित्रपटसृष्टीतील साऱ्या डिपार्टमेंटबरोबर शेअर करू इच्छिते.”
वहिदा रहमान या त्यांच्या काळातील प्रसिद्ध नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. गाइड, प्यासा, कागज के फूल आणि चौधरी का चांद हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत. आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’मध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याआधी वहिदा रहमान यांनाही पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.