अभिनेते देव आनंद यांचा ‘गाईड‘ हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषेत प्रदर्शित झाला होता. पण यामागचं कारण नेमकं काय होतं? आणि त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? चित्रपटात वहिदा रेहमान यांची वर्णी कशी लागली? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची‘च्या या भागातून.
सर्वात आधी देव आनंद यांनी त्यांचे भाऊ विजय आनंद म्हणजेच गोल्डी यांना विचारलं. गोल्डी यांनी जेव्हा इंग्रजीत स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की पर्ल बार्क यांच्या पटकथेत भारतीय असं काहीच नव्हतं. त्यामुळे आपण हिंदी चित्रपटासाठी वगळी स्क्रिप्ट लिहावी. त्यानंतर हिंदी मध्ये गाण्यांचं काय? असा प्रश्न गोल्डी यांनी केल्यावर गाण्याचं नंतर पाहू असं उत्तर देव आनंद यांनी दिलं. हे काही गोल्डी यांना पटलं नाही आणि दोघांमध्ये वाद झाला आणि ते चित्रपट करण्यासाठी नाही म्हणाले. नंतर दिग्दर्शनाची धुरा देव आनंद यांनी राज खोसला यांच्याकडे सोपवली.
या चित्रपटात अभिनेत्री म्हणून देव आनंद यांनी वहिदा रहमान यांना कास्ट केलं होतं. त्यावेळी इंग्रजी भाषेचे दिग्दर्शक यांना वहिदा रहमान यांना घ्यायची इच्छा नव्हती, त्यांना लीला नायडू यांना गाईडमध्ये घ्यायचं होतं. देव आनंद यांनी त्यांना वहिदा यांना घेण्याबद्दल मनवलं आणि वहिदा रहमान अभिनेत्री म्हणून फायनल झाल्या. दिग्दर्शन राज खोसला करणार होते. राज खोसला आणि वहिदा रहमान यांच्यात काही जमत नव्हतं. कारण त्यांच्यामध्ये वाद झाले होते. देव आनंद यांनी वहिदांना समजावण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही त्या म्हणाल्या “जर हा सिनेमा राज खोसला दिग्दर्शित करणार असतील तर मी या चित्रपटात काम करणार नाही.” नाईलाजाने देव आनंद यांना राज खोसलां ऐवजी दुसरा दिग्दर्शक शोधावा लागला. मग देव आनंद आपल्या दुसऱ्या भावाकडे गेले. त्यांचं नाव होत चेतन आनंद. देव आनंद त्यांच्याकडे पोहोचले पण चेतन आनंद यांचा हकीकत या चित्रपटाचं शेड्युल लागलं आणि त्यांनी चित्रपटासाठी नाही सांगितलं. आता हिंदीत गाईड कोण दिग्दर्शित करणार हा देव आनंद यांना मोठ्ठा प्रश्न होता. नाईलाजाने ते परत गोल्डी यांच्याकडे वळले.
गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.