प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली. पंतप्रधानांनी १२ वाजून २९ मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेला सुरुवात केली. त्यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवतही होते. याशिवाय या सोहळ्यासाठी काही दिग्गज बॉलीवूड कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह बॉलीवूडमध्ये बहुतांश सेलिब्रिटी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
विकी कौशल, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, सुभाष घई, जॅकी श्रॉफ, आयुष्मान खुराना, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन अशा बड्याबड्या सेलिब्रिटीजनी या सोहळ्याला हजेरी लावली. राम लल्लाच्या मूर्तीचे अनावरण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या सेलिब्रिटीज आणि कलाकारांची भेटही घेतली. सोशल मीडियावर हा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये पंतप्रधानांनी सगळ्या कलाकारांची भेट घेतल्याचं पाहायला मिळत आहे. याच व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी व अमिताभ बच्चन यांचीही भेट झाल्याचं स्पष्ट होत आहे. यावेळी मोदी आणि बिग बी यांच्यात छोटं संभाषण झाल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. मोदींनी बिग बी यांची विचारपूस केली. यावेळी नेमकं या दोघांमध्ये काय संभाषण झालं ते समोर आलं आहे.
पंतप्रधान मोदी हे बिग बींना हात जोडून अभिवादन करताना पाहायला मिळत आहे. मोदींनी यावेळी बिग बी यांच्या तब्येतीची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली होती. त्याविषयीची आठवण काढत मोदी हे बिग बी यांच्या हाताबद्दल चौकशी करताना आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तुमचा हात बरा आहे का? असा प्रश्न मोदींनी विचारल्यावर अमिताभ बच्चन स्मितहास्य करत होकारार्थी उत्तर दिसताना दिसले. याबरोबरच अभिषेक बच्चन, अनिल अंबानीदेखील मोदींना हात जोडून अभिवादन करताना व्हिडीओमध्ये दिसले.