ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना दहशतवादावरून सुनावलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. जावेद अख्तर यांच्या हिंमतीचं भारतीयांकडून चांगलंच कौतुक होत आहे. तर, पाकिस्तानी कलाकार आणि नेटकरी मात्र चांगलेच चिडल्याचं पाहायला मिळत आहे. पण, जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये नेमकं काय म्हटलं होतं, ते जाणून घेऊयात.
“पाकिस्तानला घरात घुसून मारलं” कंगनाच्या कौतुकावर जावेद अख्तर म्हणाले, “मी तिला फार…”
जावेद अख्तर यांनी दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील लाहोर येथे ‘फैज फेस्टिवल २०२३’मध्ये हजेरी लावली होती. हा कार्यक्रम उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी मुंबईत झालेल्या २६/११च्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. जावेद अख्तर यांनी मुंबईचा उल्लेख केला होता.
“भारतात मेहंदी हसन, नुसरत फतेह अली खानसारख्या पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले, पण आजवर कधीच पाकिस्तानमध्ये लता मंगेशकर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला नाही,” अशी खंत जावेद अख्तर यांनी बोलून दाखवली होती.
पुढे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत जावेद अख्तर म्हणाले होते, “आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे, त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही. एकूणच सध्या जे वातावरण तापलं आहे ते कमी व्हायला पाहिजे. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही पाहिलं आहे तेव्हा मुंबईवर कशापद्धतीने हल्ला झाला होता. ते लोक नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. हे लोक अजूनही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत आणि ही खदखद एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको.”
दरम्यान, जावेद अख्तर यांच्या या विधानावर तिथे उपस्थित असलेले लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र पाकिस्तानी लोक आणि तिथले कलाकार जावेद अख्तर यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यांच्या टीकेला जावेद अख्तर यांनी सणसणीत उत्तर दिलं होतं.