गदर २ सिनेमामुळे सनी देओलची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कारण ‘गदर २’ चित्रपट थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. गेल्या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ९ दिवसांत मोठी कमाई केली आहे की, तो बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. पण एकीकडे सनीचा चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड कमाई करत असताना दुसरीकडे सनीच्या आयुष्यात एक वेगळाच गोंधळ निर्माण झाला होता.
बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या ‘सनी व्हीला’ या बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात दिली होती. सनीने बँकेकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेला ‘सनी व्हिला’ नावाचा आपला व्हिला गहाण ठेवला. त्याऐवजी त्यांना जवळपास ५६ कोटी रुपये बँकेत भरायचे होते, जे अद्याप भरलेले नसल्याने बँकेने बंगल्याच्या लिलावाची नोटिस वृत्तपत्रात दिली. आता मात्र बँक ऑफ बडोदा या बँकेने ई-ऑक्शन नोटीस मागे घेतली आहे. टेक्निकल कारणामुळे ही नोटीस मागे घेण्यात आली असल्याने सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव रद्द झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
आणखी वाचा : ‘द कश्मीर फाइल्स’बद्दल प्रश्न विचारताच विवेक अग्निहोत्रींनी मुलाखतीतून घेतला काढता पाय; नेटकऱ्यांकडून टीका
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सनी देओलच्या या आलीशान बंगल्याबद्दल काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. ‘आज तक’च्या रीपोर्टनुसार या बंगल्यात नेमकं काय काय आहे हे समोर आलं आहे. ६०० स्क्वेर फुटच्या या पाच मजली बंगल्यात एक आलीशान थिएटर, प्रोडक्शन ऑफिस आणि टेरेस गार्डन आहे. हा व्हीला ‘सनी सुपर साऊंड’ या नावानेही ओळखला जातो. गांधी ग्राम रोड, मुंबईमधील या बंगल्याजवळच शिल्पा शेट्टी, गोविंदा, श्रद्धा कपूर अशा कित्येक सेलिब्रिटीजची घरं आहेत.
५० वर्षांपूर्वी धर्मेंद्र यांच्या ‘प्रतिज्ञा’ या चित्रपटाची निर्मितीही याच बंगल्यात झाली. बरेच सेलिब्रिटीज या बांगल्याचा वापर त्यांच्या चित्रपटांच्या प्राइवेट स्क्रीनिंगसाठी करायचे, याबरोबरच या बंगल्यात एक मोठा डबिंग स्टुडिओही आहे जिथे बऱ्याच मोठमोठ्या चित्रपटांच्या डबिंगचं काम पार पडलं आहे. सनीच्या बंगल्याचा लिलाव मागे घेण्यात आल्याने त्याचे चाहतेही खुश झाले आहेत. सध्या सनी ‘गदर २’च्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.