अभिनेता सनी देओल व अभिनेत्री अमिषा पटेल यांचा बहुचर्चित ‘गदर २’ हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल २२ वर्षांनी ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी ‘गदर’ पुन्हा एकदा थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आला. ‘गदर २’ चा टीझरही प्रदर्शित झाला असून लवकरच ट्रेलरही येईल. सध्या ‘गदर’ चित्रपटाच्या दोन्ही भागांची खूप चर्चा आहे. पण ‘गदर’ या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊयात या शब्दाचा अर्थ व इतर माहिती.
गदर हा शब्द उर्दू भाषेतून आला आहे. हा शब्द विद्रोह किंवा क्रांतीसाठी वापरला जातो. याशिवाय लष्करी बंड, अत्याचारी शासनकर्ते किंवा राज्यकर्त्याविरुद्ध बंड करण्यालाही गदर म्हटलं जातं. आता चित्रपटाच्या नावाशी हा अर्थ जोडल्यावर तुम्हाला त्याचा संदर्भ लागेल. हा चित्रपट तारा सिंगचा विरोध व बंड दर्शविणारा आहे. गदरला इंग्रजीत Mutiny म्हणतात, याचा अर्थ कोणाच्या विरोधात आवाज उठवणे असा होतो. यासंदर्भात ‘एबीपी लाइव्ह’ने वृत्त दिलंय.
रेख्ताच्या डिक्शनरीमध्ये गदर शब्दाचे इतरही अर्थ दिले आहेत. त्यानुसार, गदर म्हणजे एक प्रकारचा पोशाख असतो. तो लांब व रुंद असतो आणि त्यात कापूसही जास्त भरलेला असतो. याची गादीही बनवली जाते. तसेच एक अर्धवट पिकलेले फळ, जे लवकरच पिकणार आहे म्हणजेच थोडे कच्चे व थोड्या पिकलेल्या फळालाही गदर म्हटलं जातं.
गदर क्रांती
भारतात इंग्रजांचं राज्य होतं, त्यावेळी पंजाबमधील काही लोक ब्रिटिश राजवटीपासून वाचण्यासाठी उत्तर अमेरिकेत स्थायिक झाले होते, तिथे त्यांनी नक्षलवादाच्या विरोधात लढा दिला. यानंतर १३ जुलै १९१३ रोजी गदर पक्षाची स्थापना झाली आणि त्यांचे ध्येय भारताचे स्वातंत्र्य होते. त्याच काळात ‘हिंदुस्थान गदर’ हे वृत्तपत्रही प्रसिद्ध झालं होतं. त्यात क्रांतिकारकांच्या कहाण्या सांगितल्या जायच्या. त्यामुळे गदर हा शब्द क्रांती म्हणून वापरला जातो.