प्रल्हाद कक्कर यांनी ९० च्या दशकात अनेक बॉलीवूड कलाकार व क्रिकेटपटूंबरोबर जाहिराती केल्या होत्या. त्या जाहिराती प्रचंड गाजल्या होत्या. त्यांनी त्यांचे ‘अॅडमन मॅडमॅन’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्यानिमित्ताने त्यांनी काही आघाडीच्या स्टार्सबरोबर काम करतानाच्या काही आठवणी सांगितल्या. त्यांनी सचिन तेंडुलकर अवघा १६ वर्षांचा असताना त्याच्याबरोबर काम केलं होतं. त्यावेळचा एक किस्सा सांगितला.
सचिन १६ वर्षांचा होता आणि भारतीय संघात त्याची निवड झाली होती. त्यानंतर त्याला ‘पेप्सी’ या ब्रँडच्या जाहिरातीसाठी साइन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रल्हाद यांनी सचिनची चेष्टा केली होती. त्यावेळी सचिन म्हणाला होता की तो शूट न करता घरी जाईल. त्यावेळी पेप्सीने एक स्पर्धा सुरू केली होती आणि स्पर्धेतील विजेत्याला खेळाडूंच्या बॉक्समध्ये टीमबरोबर बसण्याची संधी मिळायची. “मी म्हणालो की या स्पर्धेची विजेती एक मुलगी असेल आणि तू तिला हाताने पकडून खेळाडू बसतात, त्या बॉक्समध्ये न्यायचं आहेस. तो म्हणाला, ‘नाही, मी ते करू शकत नाही’. तर मी म्हणालो, ‘का नाही?’ तो म्हणाला, ‘कारण मी कधीच कोणत्याही मुलीला असं पकडलेलं नाही’,” असं प्रल्हाद म्हणाले.
प्रल्हाद यांनी सचिनला विचारले की त्याच्या शाळेत मुली आहेत का? त्यावर सचिन म्हणाला की तो शाळेत कोणत्याही मुलीशी कधीच बोलला नाही. “तो म्हणाला, ‘नाही, मी ही जाहिरात करू शकत नाही. मी घरी जात आहे’. मग मी त्याला सांगितले की आम्ही फक्त तुझी चेष्टा करत आहोत. तुला असं काहीही करण्याची गरज नाही. तिथे एक तरुण मुलगा असेल, जो तिला तिथे घेऊन जाईल. हे ऐकल्यानंतर सचिन सुटकेचा निःश्वास सोडला होता,” असा किस्सा प्रल्हाद यांनी सांगितला.
१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…
प्रल्हाद कक्कर म्हणाले की सचिनला त्यावेळी फार चांगलं इंग्रजी बोलता येत नव्हतं, पण तो मराठी उत्तम बोलायचा. “मला त्यावेळची सचिनची सर्वात छान गोष्ट आठवते. त्याने त्या पेप्सी भरलेल्या ट्रककडे पाहिले आणि त्याने माझ्या ड्रायव्हरला विचारले, ‘मला पेप्सी मिळेल का?’ तर ड्रायव्हर म्हणाला होता की संपूर्ण ट्रक तुमच्यासाठी आहे,” अशी आठवण त्यांनी सांगितली.