बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना ही चित्रपटक्षेत्रात सक्रिय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ट्विंकलला अभिनयात फारसं यश मिळालं नसलं तरी लिखाणात तिने नाव कामावलं आहे. पुस्तक तसेच एखाद्या मॅगजीनमध्ये सदर लिहिणं यामधून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या लिखाणावरुन बऱ्याचदा वादही झाला आहे, पण ट्विंकल ही कायम तिचे विचार ठामपणे मांडत असते.
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये ट्विंकलने तिच्याबरोबर घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ट्विंकलकडे एका दिग्दर्शकाने ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनीने दिलेल्या सीनसारखी मागणी करायचा प्रयत्न केला होता, याविषयीच ट्विंकलने खुलासा केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘मन्नत’बाहेर चक्क आयुष्मान खुरानासाठी गर्दी, वाचा नेमकं काय घडलं?
ट्वीक इंडिया यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या वहिदा रेहमान यांच्याबरोबरच्या संभाषणात ट्विंकलने हा खुलासा केला. ही आठवण सांगताना ट्विंकल म्हणाली, “एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी पांढरा कुर्ता घातला होता, आणि पावसाळी गाण्याच्या चित्रीकरणासाठी आम्ही तयारी करत होतो. त्यावेळी त्या चित्रपटाचा दिग्दर्शक गुरू दत्त यांची नक्कल करत शाल पांघरून आला आणि म्हणाला, ‘मी तुला मंदाकिनी हो असं सांगितलं तर तुझं काय म्हणणं असेल?’ त्यावर मी म्हटलं की मी फक्त दोन गोष्टी सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे मी तसा सीन देणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही राज कपूर नाहीत.”
ही गोष्ट होती ‘मेला’ चित्रपटातील एका गाण्यादरम्यानची. या चित्रपटात आमिर खानबरोबर एक गाणं चित्रित करण्यात आलं होतं. ही घटना याच चित्रपटादरम्यान घडली असू शकते असा अंदाज आहे. पुढे त्या दिग्दर्शकाने ट्विंकलशी बोलणं बंद केलं, शिवाय तिला कामही दिलं नाही असं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. अर्थात या चित्रपटाच्या फ्लॉप झाल्यानंतर ट्विंकलने अभिनयाला रामराम ठोकला. आपला अभिनय चांगला नाही, शिवाय माझ्या चित्रपटांवर बंदी घातली पाहिजे असंही वक्तव्य मध्यंतरी ट्विंकलने केलं होतं.