बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान हा त्याच्या हटके चित्रपटाप्रमाणेच चित्रपटाच्या प्रक्रियेत ढवळाढवळ करण्यासाठीही प्रसिद्ध आहे. आमिरवर बऱ्याचदा हे आरोप लागले आहेत की तो दिग्दर्शकांच्या कामात दखल देतो, लुडबूड करतो अन् त्याला गोष्टी जशा हव्या असतात तशा करून घेतो. बऱ्याच दिग्दर्शकांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे तर काहींनी आमिरचीच बाजू घेत त्याचे सल्ले हे कथेच्या भल्यासाठीच असतात असं म्हणत स्वतःचा बचाव करून घेतला आहे. आज आपण आमिर खानच्या अशाच एका चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात आमिरने त्याच्यापेक्षा वयाने व अनुभवाने मोठ्या असलेल्या अभिनेत्याची तक्रार दिग्दर्शकाकडे केली होती.
हा किस्सा आहे महेश भट्ट दिग्दर्शित ‘दिल है की मानता नहीं’ या चित्रपटादरम्यानचा. या चित्रपटात आमिर खान, पूजा भट्टसह अनुपम खेरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. अनुपम खेर यांनी पूजाच्या वडिलांची भूमिका निभावली होती. नुकतंच एका संभाषणादरम्यान अनुपम खेर यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा सांगितला. त्यावेळी आमिर खानने महेश भट्ट यांच्याकडे अनुपम खेर यांच्या अत्यंत भडक आणि ओव्हर अॅक्टिंगची तक्रार केली होती.
अनुपम म्हणाले, “या लव्ह स्टोरीमध्ये मी पूजाच्या वडिलांची भूमिका निभावत होतो. मी त्यावेळी सेटवर चंकी पांडेच्या वडिलांच्या वेशभूषेत आलो होतो, डॉक्टर पांडे हे ते त्यावेळी फार प्रसिद्ध डॉक्टर होते आणि त्यांचाच संदर्भ घेऊन मी या पात्रावर काम करत होतो. त्या चित्रपट मी पूजाला लग्नाच्या मांडवातून पळून जायला सांगतो, कदाचित मी पहिला बाप असेन जो मुलीला तिच्या भर लग्नातून पळून जाऊ देतो. अशी एकूण ती व्यक्तिरेखा होती अन् आमिरने माझ्याबरोबर एक सीन केला.”
अनुपम खेर यांचं म्हणणं मध्येच तोडत महेश भट्ट म्हणाले, “आमिरने माझ्याकडे येऊन तक्रार केली अनुपम खूप भडक अभिनय (ओव्हर अॅक्टिंग) करत आहेत. एक सहकलाकार माझ्याकडे येऊन ही गोष्ट सांगतोय हे म्हंटल्यावर मला ती गोष्ट अनुपम यांच्यापर्यंत पोहोचवणे भाग होते.” त्यावेळी अनुपमनी ते ही गोष्ट सांभाळून घेतील असं महेश भट्ट यांना आश्वासन दिलं. पुढे महेश भट्ट म्हणाले, “आम्ही शेवटी जे सुरू आहे ते तसंच ठेवलं. ते पात्र अनुपम यांनी तसंच निभावलं जसं ते त्या चित्रपटासाठी अपेक्षित होतं.”
आमिर खानने महेश भट्ट यांची निर्मिती असलेल्या व विक्रम भट्ट यांच्या पहिल्या ‘गुलाम’ या चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली होती. चित्रपट चांगलाच हीट झाला होता, पण त्यावेळी महेश भट्ट आणि आमिर खान यांच्यात काही खटके उडाले होते. महेश भट्ट व त्यांची टीम चित्रपटाच्या बाबतीत गांभीर्याने काम करत नसल्याचं आमिर खानचं म्हणणं होतं अन् ही गोष्ट महेश भट्ट यांना चांगलीच खटकली होती.
एका जुन्या मुलाखतीमध्ये महेश भट्ट यांनी यावर भाष्यही केलं होतं. तेव्हा महेश भट्ट म्हणाले, “आमिरने ‘गुलाम’मध्ये माझ्याबरोबर काम केलं आहे. तो काही माझ्यासाठी फार सुखद असा अनुभव नव्हता. जेव्हा एखादा माणूस आपल्या फेम आणि ग्लॅमरच्या दबावाखाली असतो तेव्हा ते ओझं त्याच्या आजूबाजूच्या काम करणाऱ्या लोकांवरही पडतं. आर्थिकदृष्ट्या ही फार कठीण गोष्ट आहे आणि खासकरून जेव्हा तुम्ही एका चांगल्या बजेटमध्ये चित्रपट करत असता तेव्हा ते आणखी कठीण होतं. तुम्ही उत्कृष्टतेच्या मागे लागू शकता, पण परफेक्शनसाठी सतत आग्रही असू नये. परफेक्शन हा एक आजार आहे.”