बॉलिवूडमधील कलाकारांचे अफेअर्स हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सलमान खान व ऐश्वर्या राय यांचं अफेअर हे बॉलिवूडमधील गाजलेल्या प्रेमप्रकरणांपैकी एक आहे. संजय भन्साली यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमान खान व ऐश्वर्याने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यांची ऑन स्क्रीन जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
‘हम दिल दे चुके सनम’च्या शूटिंगदरम्यानच भाईजान व ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले होते. परंतु, त्यांचं अफेअर जास्त काळ टिकलं नाही. काही कारणास्तव सलमान खान व ऐश्वर्या यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर बऱ्याच काळाने ऐश्वर्याने एका मुलाखतीत सलमान खानबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं होतं. यावेळी तिने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सलमान खानबरोबर ब्रेकअपच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. “ब्रेकअपनंतर सलमान खान मला फोन करुन त्रास द्यायचा. माझं सह कलाकाराबरोबर अफेअर असल्याचा त्याला संशय होता. शाहरुख खानपासून ते अभिषेकपर्यंत सगळ्यांबरोबर त्याने माझं नाव जोडलं होतं,” असं ऐश्वर्या म्हणाली होती.
हेही वाचा>> “मी खूप प्रयत्न केले, पण…” इन्स्टा पोस्ट शेअर करत फॅशन डिझायनरने संपवलं जीवन, बेडरुममध्ये घेतला गळफास
“सलमान खानने मला मारलंही होतं. माझं नशीब चांगलं, म्हणून माझ्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आल्या नाहीत. काहीच झालं नाही, असं दाखवून मी शूटिंगसाठी जायचे. त्याने मला खूप त्रास दिला आहे. त्याचे फोन न उचलल्यावर तो स्वत:ला दुखापत करुन घ्यायचा. २००१ साली त्याने दारू पिऊन माझ्या घराबाहेर तमाशा केला होता. माझ्या वडिलांनी त्याच्याविरोधात तक्रारही केली होती,” असंही ऐश्वर्याने सांगितलं होतं.
हेही वाचा>> पाणावलेले डोळे, भांगेत कुंकू अन्…; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील सीतामातेबद्दलची ‘ती’ चूक सुधारली
ऐश्वर्याच्या या आरोपांवर सलमान खानने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं होतं. “मी तिला कधीही मारलेलं नाही. मी जेव्हा भावनिक होतो, तेव्हा मी स्वत:चं नुकसान करुन घेतो. भींतीवर डोकं आपटून मी स्वत:ला दुखापत केली आहे. मी कोणाही दुसऱ्या व्यक्तीला दुखावू शकत नाही. मी फक्त सुभाष घई यांच्यावर हात उगारला होता. परंतु, तेव्हाही मी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांची माफी मागितली होती,” असं म्हणत सलमान खानने ऐश्वर्याच्या आरोपांचं खंडन केलं होतं.