Akshaye Khanna on Vinod Khanna: अभिनेता अक्षय खन्ना नुकताच ‘छावा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याने औरंगजेबाची भूमिका साकारली. त्याने ज्या पद्धतीने ही भूमिका साकारली, त्याचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. आता अभिनेत्याचे एक जुने वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे.
अक्षय खन्नाने २०१७ मध्ये ‘आयएएनएस’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याला विनोद खन्ना यांचा बायोपिक बनविण्याबदद्ल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अक्षय खन्ना म्हणालेला, “एखाद्या अभिनेत्यासाठी व्यक्तिरेखा साकारणं खूप आव्हानात्मक असतं. कारण- तुम्ही अशा व्यक्तीची भूमिका करता, जो प्रत्यक्षात अस्तित्वात होता. त्यामुळे अशी भूमिका साकारणं कठीण असते. वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी १० वेळा विचार केला पाहिजे.”
अक्षय खन्ना वडिलांबरोबर काम न करण्याबाबत काय म्हणालेला?
२००८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय खन्नाने म्हटले होते की, इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करू नये. त्यापैकी माझे वडील विनोद खन्ना एक आहेत आणि दुसरे अमिताभ बच्चन आहेत. त्यांच्याबरोबर तितक्याच आत्मविश्वासानं एकत्र काम करणं अशक्य आहे.
अक्षय खन्ना पुढे म्हणाला होता की, पडद्यावर माझ्या वडिलांची बरोबरी करणं कठीण आहे. त्यांचा पडद्यावरचा वावर खूप प्रभावी आहे. असे काही कलाकार आहेत, जे तुम्हाला भारावून टाकतात, माझे वडील त्यापैकी एक आहेत.
अक्षय खन्नाने हिमालय पुत्र या चित्रपटात वडील विनोद खन्ना यांच्याबरोबर काम केले होते. त्यानंतर त्यांनी कधीही एकत्र काम केले नाही. तसेच त्याने २००४ मध्ये दीवार : लेट्स ब्रिंग अवर हिरोज बॅक या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केले होते. या चित्रपटात के. के. मेनन, अमृता राव व संजय दत्तदेखील होते.
विनोद खन्ना व अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांतून एकत्र काम केले आहे. अमर, अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर व रेश्मा और शेरा यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांचे हे चित्रपट प्रचंड गाजले. दरम्यान, २०१७ ला विनोद खन्ना यांचे निधन झाले. आजही त्यांच्या अनेक चित्रपटांची चर्चा रंगताना दिसते.