When Amitabh Bachchan Posted Photo with Rekha: रेखा आणि अमिताभ बच्चन एकेकाळी प्रेमात होते. रेखा कायम अमिताभ बच्चन यांच्यावरचं प्रेम व्यक्त करतात. पण अमिताभ मात्र बोलणं टाळतात. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेले अमिताभ बच्चन यांनी स्वतः एकदा रेखाबरोबरचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

एकेकाळी रेखा आणि अमिताभ एकत्र काम करायचे, दोघांनी अनेक चित्रपटात काम केलं. त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं होतं. पण जेव्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चा जया बच्चन यांच्यापर्यंत पोहोचल्या, तेव्हा त्यांनी रेखा यांना घरी बोलावलं. आदरातिथ्य करून स्वागत केले आणि नंतर ‘अमित माझे पती आहेत आणि माझेच राहतील’ असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. त्यानंतर कधीच अमिताभ व रेखा यांनी एकत्र काम केलं नाही.

अमिताभ यांनी जानेवारी २०२४ मध्ये त्यांच्या ब्लॉगवर एक फोटो पोस्ट केला होता. ब्लॉगमध्ये त्यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांच्या काही चांगल्या आठवणी सांगितल्या. तसेच एक जुना फोटो शेअर केला होता. या फोटोत रेखा, राज कपूर, विनोद खन्ना, संगीत दिग्दर्शक कल्याण, रणधीर कपूर, मेहमूद आणि शम्मी कपूर यांच्यासह ७० च्या दशकातील दिग्गजांचा समावेश होता.

फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हातात माइक दिसतोय आणि ते प्रेक्षकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहेत, तर विनोद खन्ना, कल्याण आणि राज कपूर त्यांच्यासोबत स्टेजवर उभे आहेत. या फोटोत रणधीर कपूर, मेहमूदही दिसत आहेत. दूर कोपऱ्यात शम्मी कपूर आणि रेखा उभे आहेत. सर्व बॉलीवूड सेलिब्रिटींने एका छताखाली एकत्र आणणारा हा कदाचित लाइव्ह कार्यक्रम असावा असं दिसतंय.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला फोटो (सौजन्य – अमिताभ बच्चन ब्लॉग)

अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन काय दिलेलं?

अमिताभ बच्चन यांनी रविवारी रात्री हा फोटो शेअर केला, पण त्या फोटोमागची गोष्ट नंतर सांगणार असल्याचं त्यांनी लिहिलं. हा फोटो आपल्या ब्लॉगवर शेअर करत “या फोटोमागे खूप मोठी गोष्ट आहे… ती कधीतरी सांगेन,” असं त्यांनी लिहिलं होतं.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते शेवटचे कल्कि 2898 एडी या चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत झळकले होते. नंतर त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या पर्वाचं सूत्रसंचालन केलं. सध्या ते त्यांच्या आगामी प्रकल्पाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत.