अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘दोस्त’, ‘काला पत्थर’, ‘दोस्ताना’, ‘शान’ आणि ‘नसीब’ यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. दोघांच्या मैत्रीत एकेकाळी दुरावा आला होता, पण नंतर त्यांचे गैरसमज दूर झाले. आता ते चांगले मित्र आहेत. अमिताभ व शत्रुघ्न यांनी रितेश देशमुख व साजिद खानला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत दोघांनी अनेक किस्से सांगितले होते. एकदा तर कार खराब झाल्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांना धक्का मारायला सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी वक्तव्य केलं होतं. “त्यांच्याकडे अनेक चांगले गुण आहेत, जे मी आताही सांगू शकतो, पण त्यांना प्रत्येक ठिकाणी उशिरा येण्याची सवय आहे हे सर्वांना माहीत आहे. आज ते माझ्या अर्धा तास आधी पोहोचले” असं बच्चन म्हणाले. हे ऐकल्यावर शत्रुघ्न हसत म्हणाले, “आयुष्यात पहिल्यांदाच मी त्यांच्या आधी पोहोचलो आहे.”

शत्रुघ्न सिन्हा मध्येच व्हायचे गायब

अमिताभ यांनी शत्रुघ्न यांच्याबरोबर ‘शान’ आणि ‘नसीब’ या दोन्ही चित्रपटांसाठी शूटिंग करतानाचा अनुभव सांगितला होता. “आम्ही त्याकाळी शिफ्टमध्ये काम करायचो. तर, ७ ते २ ही शानची शिफ्ट होती आणि २ ते १० ही नसीबची शिफ्ट होती. शानचे शूटिंग फिल्मसिटीमध्ये व्हायचे आणि नसीबचे शूटिंग चांदिवली स्टुडिओमध्ये चालू होते. मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सकाळी ७ वाजता पोहोचायचो आणि ते ११-१२ पर्यंत पोहोचायचे आणि पॅकअपची वेळ २ वाजताची होती. मी म्हणायचो चला आता दुसऱ्या शूटिंगला जायचं आहे. तर हे म्हणायचे चला जाऊ. मी २ वाजता चांदिवली स्टुडिओला पोहोचायचो, आणि हे महाशय ६ वाजता तिथे यायचे. दोघांना एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागायचं, पण हे मध्येच कुठे गायब व्हायचे?” असं अमिताभ म्हणाले होते.

अमिताभ बच्चन व शत्रुघ्न सिन्हा (फोटो – इन्स्टाग्राम)

मरीन ड्राईव्हवर कार ढकलायला सांगायचे

अमिताभ बच्चन यांनी सांगितलेलं की शत्रुघ्न सिन्हा त्याकाळी आघाडीचे अभिनेते होते, त्यामुळे ते इतरांना लिफ्ट द्यायचे किंवा त्यांची गाडी द्यायचे. “आमच्याकडे फक्त एक कार होती, जी त्यांची होती. ती एक लहानशी गाडी होती. आम्ही चित्रपट पाहण्यासाठी वांद्रे ते कुलाबा प्रवास करायचो. आम्ही सर्वजण गाडीत एकत्र बसायचो आणि ती अनेकदा मध्येच बंद व्हायची. मग ते (शत्रुघ्न सिन्हा) आरामात गाडीत बसायचे आणि आम्हाला गाडी ढकलायला सांगायचे. मी मरीन ड्राईव्हवर खाली उतरून कार ढकलायचो आणि ते कारमध्ये आरामात बसून व्यवस्थित ढकल म्हणायचे,” असं अमिताभ बच्चन म्हणाले होते.

शत्रुघ्न सिन्हा कधीच वेळेवर येत नसे, असा खुलासा बिग बींनी केलेला. “कोणताही चित्रपट असो, विमान प्रवास असो वा कार्यक्रम, ते कधीच वेळेवर यायचे नाही. ते खूप निवांत असायचे, त्यांना फ्लाइट पकडण्याची चिंता अजिबात नसायची. शेवटच्या कॉलनंतर फ्लाइट टेकऑफची वेळ आली की त्यांना बोर्डिंगसाठी पाठवावं लागायचं,” असं बच्चन म्हणाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When amitabh bachchan revealed shatrughan sinha use to ask him to push his car on marine drive hrc