Amitabh Bachchan Rekha : अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाला ५० पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. पण अमिताभ यांचा विषय निघाला की रेखा यांचा उल्लेख होतोच. एकेकाळी रेखा व अमिताभ बच्चन प्रेमात होते असं म्हटलं जातं. रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यावरील त्यांचं प्रेम बरेचदा व्यक्त केलं आहे. पण दुसरीकडे, अमिताभ यांनी मात्र ते कधीच स्वीकारलं नाही. एकदा अमिताभ यांना थेट नाव घेऊन रेखाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तराची खूप चर्चा झाली होती.

अभिनेत्री सिमी गरेवालचा शो एकेकाळी खूप लोकप्रिय होता. तिने अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यामध्ये रेखा, अमिताभ बच्चन व जया यांच्या मुलाखतींचा समावेश आहे. सिमिने एकदा रेडिफला मुलाखत दिली होती. यात तिने १९९८ मध्ये अमिताभ बच्चन यांची जी मुलाखत घेतली होती, त्याबद्दल सांगितलं होतं. तेव्हा बच्चन यांचे चित्रपट फार चालत नव्हते आणि त्यांची निर्मिती कंपनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडची (ABCL) परिस्थिती फार चांगली नसल्याने ते संघर्ष करत होते. त्यावेळी बिग बींचा आत्मविश्वास डगमगला होता, असं सिमी म्हणाली होती.

सिमीने या मुलाखतीसाठी खूप तयारी केली होती, मुलाखतीआधी एकदा त्यांची भेटही घेतली होती. “मी त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, ‘अमितजी, तुम्ही या मुलाखतीत १०० टक्के द्यावे आणि प्रामाणिक राहावं असं मला वाटतं. त्यावर ते म्हणाले ‘मी १०० टक्के देईन, मी जसा आहे तसाच मुलाखतीत असेन,” असं सिमीने सांगितलं होतं.

amitabh bachchan reacted on his relationship with rekha 1
अमिताभ बच्चन व रेखा (फोटो – स्क्रीनशॉट)

“आम्ही खूप गोष्टींबद्दल बोललो. त्यांचे बालपण, आई-वडील, एबीसीएल कंपनी, त्यांचे फ्लॉप चित्रपट, त्यांचे पुनरागमन, त्यांचे कुटुंब, जया, मुलं, त्यांना आवडणाऱ्या महिला, त्यांचे व्यावसायिक निर्णय या सर्व गोष्टींबद्दल बोललो. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे उत्तरं दिली असं मला वाटतं. बरेच लोक त्या मुलाखतीनंतर म्हटले की ‘अमिताभ बच्चन तसे नाहीत!’ किंवा ‘ते रेखाबद्दल खरं बोलत नव्हते!’ पण मला विश्वास आहे की त्या मुलाखतीत ते जे बोलले ते खरं होतं. पण लोक त्याच गोष्टीवर विश्वास ठेवतात ज्यावर त्यांना ठेवायचा आहे,” असं सिमी म्हणाली होती.

रेखाबद्दल अमिताभ बच्चन म्हणाले होते….

“ती माझी सहकलाकार आणि सहकारी आहे. आणि जेव्हा आम्ही एकत्र काम करत होतो, तेव्हा साहजिकच आम्ही एकमेकांना भेटलो होतो. आमच्यात काहीच साम्य नाही. काहीवेळा आपण एखाद्या कार्यक्रमात, म्हणजे एखाद्या पुरस्कार सोहळ्यात वगैरे भेटतो तेवढंच,” असं रेखाबरोबरच्या नात्याबद्दल विचारलं असता अमिताभ बच्चन सिमी गरेवालला म्हणाले होते.