ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत श्याम बेनेगल, हृषिकेश मुखर्जी आणि बासू चॅटर्जी यांसारख्या दिग्गज चित्रपट दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. पालेकरांनी एका चित्रपटाच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला. श्याम बेनेगल यांनी पालेकरांना एका सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री स्मिता पाटील यांना नकळत झापड मारायला सांगितलं होतं. या गोष्टीला माझा पूर्णपणे विरोध होता, पण श्याम बेनेगल ठाम होते. तो प्रसंग आजवर विसरू न शकल्याचं पालेकर म्हणाले. तसेच हा प्रसंग शूटिंगदरम्यान कलाकारांमधील संमती आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित करतो, असंही त्यांनी नमूद केलं.
पालेकर यांनी ‘भूमिका’ सिनेमाच्या सेटवर घडलेली घटना द ललनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. “श्याम बेनेगल यांनी मला सांगितलं की मी तिला (स्मिता पाटील) न सांगता झापड मारायची आहे. मी नकार दिला. ‘नाही, मी ते करू शकत नाही,’ असं मी म्हणालो. मी रिहर्सल न केलेली कोणतीही गोष्ट करण्यास नकार दिला. कारण तुम्ही काय करणार आहात, हे तुमच्या सहकलाकाराला माहीत असायला हवं. त्यांच्या नकळत काहीही करणं माझ्या मते चुकीचं आहे आणि म्हणून मी ते करणार नाही. ‘मी महिलेवर हात कसा उचलू?’ मी हादरलो होतो. मी माझ्या आयुष्यात असं कधीचं केलेलं नाही आणि मी ते कधीही करणार नाही,” असं अमोल पालेकर म्हणाले.
हेही वाचा – “मला खूप वैताग…”, गोविंदाच्या लेकीने फ्लॉप बॉलीवूड करिअरबद्दल केलंय भाष्य; ‘या’ एकमेव चित्रपटात केलंय काम
ती संतापली होती – अमोल पालेकर
अमोल पालेकरांचा हा सीन करण्यास नकार होता, तरीही बेनेगल यांनी त्यांना तयार केलं. “शॉट सुरू झाला आणि स्मिता अभिनय करू लागली, त्याच दरम्यान एका क्षणी मी तिचा हात धरून तिला झापड मारली. स्मिता भांबावली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की मी तिला झापड मारली आहे, ती घाबरली होती. तिला अपमानित वाटत होतं, ती संतापली होती. कॅमेरा फिरत होता, सीन कट झाला नव्हता, कॅमेऱ्याने तिचे सगळे हावभाव रेकॉर्ड केले. मी स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत उभा होतो. मी बाकी सगळं विसरलो होतो, काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला खूप अस्वस्थ वाटत होतं.”
हेही वाचा – “मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
सीन संपल्यानंतर दोघेही रडलो – अमोल पालेकर
अमोल पालेकर आणि स्मिता पाटील दोघांना या प्रसंगानंतर अश्रू अनावर झाले होते. “श्याम बेनेगल ‘कट’ म्हणाले आणि मी आधी स्मिताकडे गेलो आणि तिला मिठी मारली. तिची मनापासून माफी मागितली. मी म्हणालो, ‘मला खूप माफ कर स्मिता’ आणि आम्ही दोघेही खूप रडलो. भूमिकाचे शूटिंग करताना आमच्याबरोबर हा प्रसंग घडला होता,” असं पालेकर म्हणाले.