बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मीडियाचं नातं हे एका भांडकुदळ भावंडांसारखं आहे. सध्या तर बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती असते, पण ८० आणि ९० च्या काळात जेव्हा लोकांच्या हातात स्मार्टफोन्स नसायचे तेव्हा या सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांना जोडणारा एकमेव दुवा असायचा तो म्हणजे मीडिया किंवा सिनेपत्रकार.
तेव्हासुद्धा पत्रकार आणि बॉलिवूड कलाकार यांच्यात बऱ्याचदा खटके उडायचे. असंच एकदा एका पत्रकाराला अभिनेते अनुपम खेर यांनी तेव्हा थोबाडीत लगावली होती. तेव्हा त्यांच्या या कृतीचं कित्येक बॉलिवूडकरांनी समर्थन केलं होतं, तेव्हा बॉलिवूडमधील बडेबडे कलाकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.
तेव्हा याविषयी सलमान खान, संजय दत्त, जॅकी श्रॉफ तसेच अनुपम खेर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं, सध्या तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘रेअर फोटो क्लब’ या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. त्यावेळी बऱ्याच मॅगजीन तसेच वृत्तपत्रातून बॉलिवूड कलाकारांबद्दल बऱ्याच उलट सुलट गोष्टी लिहून यायच्या.
१९९२ मध्ये ‘स्टारडस्ट’ नावाच्या मॅगजीनमध्येसुद्धा अशाच काही गोष्टी छापून आल्या होत्या आणि यावरूनच हा सगळा वाद निर्माण झाला होता. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड कलाकारांनी याबद्दल उघडपणे बाजू घेतली आहे. शिवाय तेव्हा याच कलाकारांनी मुंबईच्या रस्त्यांवर उतरून अशा प्रकरच्या पत्रकारतीतेबद्दल आवाज उठवला होता. याचदरम्यान अभिनेते अनुपम खेर यांनी एका पत्रकाराला थोबाडीत मारल्याने तेव्हा चांगलंच वातावरण तापलं होतं.
याविषयी या व्हिडिओमध्ये अनुपम खेर म्हणाले होते, “मी ३ वर्षं एनएसडीमध्ये शिक्षण घेतलं, एकवर्षं एफटीआयमध्ये शिक्षण घेतलं, त्यानंतर तब्बल ३ वर्षं मी शिक्षक म्हणून काम केलं, स्ट्रगलच्या दिवसांत मी रस्त्यावर झोपलो, आणि ८ वर्षांच्या या मेहनतीनंतर आज एखाद्या मॅगजीनमध्ये अशा मसाला लावलेल्या खोट्या गोष्टी वाचायला मिळतात हे दुर्दैवी आहे. मी एकाच्या हातात फलक पाहिला, “नो हेअर, नो ब्रेन” याचा अर्थ महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनासुद्धा मेंदू नव्हता का?” अशा शब्दांत तेव्हा अनुपम खेर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती.
सलमान खानने सुद्धा अनुपम यांची बाजू घेत खुलासा केला, तो म्हणाला, “हे जे थोबाडीत मारलं आहे ते अत्यंत योग्य गोष्ट केली आहे. कारण इतके दिवस ही लोकं ज्यापद्धतीने आमची प्रतिमा मलिन करू पहात आहेत तीसुद्धा आमच्या तोंडावर एक चपराकच होती.” शिवाय या व्हिडिओमध्ये संजय दत्तने सुद्धा प्रतिक्रिया दिली, “मी त्यांच्या जागी असतो तर मी त्या व्यक्तीला बेदम मारलं असतं.” असं वक्तव्य करत तेव्हा संजय दत्तने अनुपम खेर यांच्या कृतीचं समर्थन केलं होतं.
अनुपम खेर यांनी गेल्यावर्षी ‘उंचाई’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’सारखे सुपरहीट चित्रपट दिले. आता अनुपम खेर विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात त्यांच्याबरोबर नाना पाटेकर, पल्लवी जोशी, सप्तमी गौडा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.