अनुपम खेर हे त्यांच्या अभिनयाबरोबच बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर ते त्यांचे राजकीय तसेच सामाजिक विचार मांडत असतात. गेली कित्येक वर्षं अनुपम हे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजश्री प्रोडक्शनच्या ‘सारांश’ या चित्रपटातून अनुपम खेर यांना ओळख मिळाली. त्यांच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. फार कमी वयात त्यांनी एका म्हाताऱ्याची भूमिका निभावलेली पाहून कित्येक लोक दंग झाले. याच चित्रपटातून मात्र त्यांना आधी काढण्यात आलं होतं. याविषयी एका मुलाखतीमध्ये अनुपम यांनी खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युट्यूबवरील ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात अनुपम खेर यांनी हजेरी लावली आणि त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल गप्पा मारल्या. तसंच मुंबईविषयी त्यांना काय वाटतं याबद्दलही अनुपम खेर यांनी त्यांचं मत मांडलं. शिवाय ‘सारांश’ या चित्रपटात जरी प्रथम अनुपम खेर यांना भूमिका मिळाली असली तरी काही महिन्यांनी त्यांच्याकडून ती भूमिका काढून घेण्यात आली होती.

आणखी वाचा : “पहिलं रिलेशनशिप, जीवनातील संघर्ष अन्…” अनुपम खेर यांना ‘एनएसडी’ने दिलेले आयुष्यातील महत्त्वाचे धडे

हा किस्सा या मुलाखतीमध्ये सांगताना अनुपम म्हणाले, “राजश्री प्रोडक्शनला सारांशमधील भूमिकेसाठी एक चांगला स्टार हवा म्हणून त्यांनी माझ्याऐवजी संजीव कुमार यांना घ्यायचं ठरवलं हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला प्रचंड राग आला. मी काही महीने या भूमिकेसाठी तयारी करत होतो. शेवटी मी मुंबई सोडून जायचा निर्णय घेतला आणि जाताजाता महेश भट्ट यांना भेटून खरं काय वाटतं ते सांगायचं ठरवलं. त्यामुळे मी माझं सामान बांधलं आणि थेट महेश भट्ट यांच्या पाली हिल येथील घरी गेलो.”

तिथे गेल्यावर सर्वप्रथम महेश भट्ट यांनी अनुपम यांची समजूत काढायचा प्रयत्न केला. संजीव कुमारबरोबर छोटासा रोल केला तर लोक दखल घेतील असंही महेश भट्ट अनुपम खेर यांना म्हणाले. यावर अनुपम खेर म्हणाले. “मी माझं सामान टॅक्सीमध्ये भरलं आहे, मी हे शहर सोडून जातोय, पण जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जगातले सर्वात जगातले मोठे फ्रॉड मनुष्य आहात. तुम्हाला माहितीये की मी ६ महीने या भूमिकेसाठी मेहनत घेतोय. राजश्रीच्या लोकांना एवढं सांगायची तुमच्यात हिंमत नाही की मी याच माणसाबरोबर काम करणार म्हणून. मी खूप चिडलो होतो आणि त्याच रागात माझ्या तोंडून निघून गेलं की, मी ब्राह्मण आहे आणि मी तुम्हाला शाप देतो.”

यानंतर महेश भट्ट यांनी अनुपम खेर यांची समजूत काढली आणि राजश्री प्रोडक्शनमध्ये फोन करून अनुपम खेर यांनाच ती भूमिका मिळायला हवी असं स्पष्ट सांगितलं. यानंतर अनुपम यांनी त्यांच्या अभिनयाने ती भूमिका अजरामर केली. या मुलाखतीमध्ये अनुपम खेर म्हणाले की, “संजीव कुमार खूप ग्रेट अभिनेते होते, पण ही भूमिका मी नक्कीच त्यांच्यापेक्षा उत्तम केली आहे.” अनुपम खेर यांनी ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटात काम केलं. यातील त्यांची भूमिका आणि त्यांच्या अभिनयाची भरपूर प्रशंसा झाली. नुकताच अनुपम यांचा अमिताभ बच्चन आणि बोमन इराणीबरोबरचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटालाही उदंड प्रतिसाद दिला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When bollywood actor anupam kher curse director mahesh bhatt for this strange reason avn