अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणबीर कपूर एकेकाळी रिलेशनशीपमध्ये होते. दोघांच्या प्रेमाच्या सगळीकडे चर्चा होत्या व ते लग्नही करतील, असं म्हटलं जात होतं. दीपिकाने तर रणवीरसाठी तिच्या मानेवर टॅटूही काढला होता. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. त्यानंतर दीपिकाने रणवीर सिंगशी लग्नगाठ बांधली, तर रणबीर कपूरने आलिया भट्टशी लग्न केलं.
रणबीर व दीपिका आयुष्यात बरेच पुढे निघून गेले आहेत, पण तिच्या मानेवर तिने रणबीरसाठी काढलेल्या टॅटूची चर्चा आजही होत असते. तिने तिच्या मानेवर ‘RK’ लिहून घेतलं होतं. एकदा ‘कॉफी विथ करण’च्या तिसऱ्या पर्वात तिने हजेरी लावली होती. त्यावेळी तिला या टॅटूबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी तिने खुलासा केला होता की तिला तिच्या निर्णयाचा पश्चाताप झाला नाही.
ती म्हणाली होती, “हे असं काहीतरी आहे, जे मला त्यावेळी योग्य वाटलं होतं आणि मला कधीच पश्चाताप झाला नाही आणि मी तो टॅटू काढून टाकण्याचा कधीही विचार केला नाही. मला माहीत आहे की मीडिया सतत म्हणत आहे मी तो टॅटू काढला आहे. पण तो तसाच आहे आणि तो टॅटू हटवण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही.”
दरम्यान, रणबीर कपूर सध्या ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत, तर दीपिका देखील तिच्या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग करत आहे.