बॉलिवूडचे शहेनशहा सिनेसृष्टीचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. त्यांनी ७० ते ८०च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले होते. आजही कित्येक दिग्दर्शक आणि लेखक अमिताभ बच्चन यांना समोर ठेवून चित्रपट लिहितात. २०२३ मध्येसुद्धा अमिताभ यांचा काम करण्याचा उत्साह आणि त्यामागील त्यांच्या जिद्दीचं सगळेच कौतुक करतात, पण ९०च्या दशकात बिग बींवर जे आर्थिक संकट कोसळले त्यामुळेच आज या वयातही ते इतकी मेहनत घेतात.
९० च्या दशकात अमिताभ बच्चन यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यांची आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली होती. स्वत: अमिताभ यांनी बऱ्याच मुलाखतींमध्ये याचा खुलासा केला होता. १९९९ साली अमिताभ बच्चन यांची कंपनी ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ला (ABCL) खूप मोठे नुकसान झाले होते. बीग बींची ही कंपनी चित्रपटांची निर्मिती, डिस्ट्रीब्यूशन आणि इवेंट मॅनेजमेंटचे काम करत होती. कंपनीवर जवळपास ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्याकाळात प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी बिग बी यांना मदतीचा हात पुढे केला होता.
आणखी वाचा : “ते पाठ खाजवण्यासाठी…”८० वर्षीय रॉबर्ट डी निरोंच्या अश्लील वर्तणूकीबद्दल असिस्टंटचा धक्कादायक खुलासा
२०१७ मध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी भाषण देताना त्यावेळची आठवण शेअर केली होती. त्यावेळी याबद्दल बोलताना बिग बी चांगलेच भावुक झाले होते. ‘बॉलिवूड तहलका’ने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अमिताभ म्हणाले, “माझ्या आयुष्यातला तो अत्यंत खडतर काळ होता, मी दिवाळखोरी जाहीर केली होती. मी बनवलेल्या कंपनीला प्रचंड नुकसान झेलावं लागलं त्यावेळी माझ्या खासगी बँक अकाऊंटमध्येसुद्धा खडखडाट होता. प्रचंड कर्ज माझ्या डोक्यावर होतं. माझ्याकडे कोणताही पैसे कामावण्याचा मार्ग राहील नव्हता, सरकारी संस्थांनी माझ्या घरी छापे मारले होते.”
याच कार्यक्रमात धीरूभाई यांनी अमिताभ यांना मदतीचा हात पुढे केल्याचा खुलासा खुद्द बिग बी यांनी केला. त्यावेळी धीरूभाई अनिल अंबानीला म्हणाले, “याचा पडता काळ आहे, आपण याला काही पैसे मदत म्हणून देऊयात.” हे धीरूभाई यांचे शब्द असल्याचं बच्चन यांनी सांगितलं. जेव्हा अनिल अंबानी अमिताभ बच्चन यांच्याकडे आले आणि त्यांना याबद्दल सांगितलं तेव्हा ते फार भावुक झाले. याबद्दल ते म्हणाले, “त्यांनी मला जी काही मदत देऊ केली होती, त्यातून माझ्या सगळ्या आर्थिक समस्या दूर होणार होत्या. मी त्यावेळी फार भावुक झालो आणि त्यांच्या मदतीचा आणि त्यांच्या दानी वृत्तीचा मान ठेवत मी ती मदत नाकारली. परमेश्वराची माझ्या कृपादृष्टी सदैव होती अन् काही दिवसांत मी यातून बाहेर पडलो. मला काम मिळू लागलं आणि हळूहळू मी कर्ज फेडलं.”
त्यानंतर एका खास कार्यक्रमासाठी धीरूभाई यांनी अमिताभ बच्चन यांना घरी बोलावलं होतं. त्यावेळी बरेच दिग्गज लोकसुद्धा तिथे उपस्थित होते. त्यावेळी धीरूभाई अंबानी यांनी त्यांच्या मित्रपरिवारासमोर अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं होतं. धीरूभाई म्हणाले, “या मुलाने अक्षरशः शून्यातून उभं राहून स्वतःच्या हिंमतीवर हे साम्राज्य उभं केलं आहे, मला याचा खूप अभिमान आणि आदर वाटतो.” ही आठवणदेखील अमिताभ यांनी त्यांच्या या भाषणात सांगितली होती.