अभिनेता इमरान हाश्मीला चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांमुळे ‘सिरियल किसर’ही म्हटलं जातं. इमरान चित्रपटांमध्ये खूप बोल्ड सीन देतो. त्याच्या या सीनवर त्याची पत्नी परवीन शाहनीची प्रतिक्रिया काय असते, याबद्दल एकदा त्याला विचारण्यात आलं होतं. त्यावर अभिनेत्याने उत्तर दिलं होतं.

काही जुन्या मुलाखतींमध्ये इमरानने सांगितलं होतं की चित्रपटांवर किसिंग सीन केल्यामुळे त्याची बायको त्याला मारत असे. “ती अजूनही मारते, पण आता तुलनेने कमी मारते. आधी ती बॅगने मारायची आता हाताने मारते, बऱ्याच वर्षांमध्ये यात बदल झाला आहे,” असं इमरानने २०१६ मध्ये त्याच्या ‘द किस ऑफ लाइफ’ या पुस्तकाच्या लॉन्चिंगवेळी सांगितलं होतं.

परवीन चिडल्यानंतर तो तिला कसे शांत करतो हे देखील त्याने सांगितलं होतं.“मी तिच्यासाठी हँडबॅग खरेदी करतो. प्रत्येक चित्रपटातील सीनसाठी तिला एक बॅग गिफ्ट म्हणून देतो. तिच्याकडे बॅगांनी भरलेले एक कपाट आहे, तरीही तिला बॅगच हवी असते. आमच्या दोघांमध्ये ही डील झाली आहे,” असं त्याने सांगितलं होतं.

२०१०मध्ये एकदा इमरान म्हणाला होता. की परवीनने त्याचा ‘क्रूक’ चित्रपट पाहिल्यानंतर तिने त्याला मारलं होतं. “माझ्या चित्रपटांच्या पहिल्या स्क्रिनिंगमधून बाहेर पडल्यावर माझी पत्नी नेहमीच मला मारते. पण तिला माहित आहे की हे माझं काम आहे, त्यामुळे मला ते सीन करावेच लागेल,” असं तो म्हणाला.

२०१४ मध्ये ‘कॉफ़ी विथ करण’मध्ये तो आला होता. तेव्हा त्याने त्याच्या एका चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान त्याच्या पत्नीने कशी प्रतिक्रिया दिली याबद्दलचा एक किस्सा सांगितला होता. “पहिल्या सीटवर माझी बायको मला नखं मारत होती. ‘तू काय केलं आहेस, तू मला हे सांगितलं नाहीस, तू जे काही करतोय ते बॉलिवूड नाही,’ असं ती म्हणाली. तसेच तिच्या नखांमुळे मला जखम झाली होती आणि रक्त वाहू लागलं होतं, असंही त्याने सांगितलं होतं.