अभिनेता गोविंदा आज २१ डिसेंबर रोजी ५९ वा वाढदिवस साजरा करतोय. ८० आणि ९० च्या दशकातील उत्कृष्ट अभिनेता आणि डान्सर अशी त्याची ओळख आहे. गोविंदाने ‘दुल्हे राजा’, ‘अखियों से गोली मारे’, ‘हसीना मान जायेगी’, ‘जोडी नंबर वन’, ‘कुली नंबर वन’ आणि ‘आंटी नंबर वन’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ९०च्या दशकात गोविंदा तरुणाईच्या गळ्यातील ताईत होता. त्याने एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट देत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्याने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींबरोबर काम केलंय. यशाच्या शिखरावर असताना गोविंदाचं नाव त्या काळातील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींशी जोडलं गेलं. खरं तर गोविंदाचा त्याची पत्नी सुनिताशी साखरपुडा झालेला असताना तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. त्यासाठी त्याने सुनिताबरोबर साखरपुडा मोडला होता. ती अभिनेत्री होती नीलम कोठारी.
गोविंदा आणि नीलम यांनी ‘खुदगर्ज’, ‘लव्ह 86’, ‘हत्या’, ‘इलजाम’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. नीलम आणि गोविंदाचा ऑन-स्क्रीन रोमान्स प्रेक्षकांना खूप आवडला होता. गोविंदा नीलम कोठारीच्या प्रेमात वेडा झाला होता.’स्टारडस्ट मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला होता, “मला आठवतं की मी तिला पहिल्यांदा प्राणलाल मेहतांच्या ऑफिसमध्ये भेटलो होतो. तिने पांढरे शॉर्ट्स घातले होते. तिचे लांब केस एखाद्या परीसारखे दिसत होते. तिने मला खूप छान पद्धतीने ‘हॅलो’ म्हटलं होतं. पण, माझं इंग्रजी चांगलं नसल्याने मी तिच्याशी बोलायला घाबरलो होतो.”
गोविंदा पुढे म्हणाला, “माझा विश्वासच बसत नव्हता की एवढी तरुण मुलगी नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून स्वभावाने इतकी चांगली असू शकते. मी माझे मित्र आणि कुटुंबीयांसमोर तिची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकायचो नाही. मी सुनीतालाही बदलायला सांगायचो, तिला नीलमसारखं हो असं सांगायचो. यामुळे सुनीताची चिडचिड व्हायची. नंतर मी खूप व्यग्र राहू लागलो आणि सुनीतासोबतच्या माझ्या नात्यात बदल झाले. तिला असुरक्षित वाटू लागलं आणि तिला नीलमचा राग येऊ लागला. मी तिला काहीच मदत करू शकत नव्हतो. सुनीता मला इतके टोमणे मारायची की मी चिडायचो. एके दिवशी आमचं भांडण झालं आणि मी सुनीताला नीलमबद्दल काहीतरी सांगितलं. मी खूप संतापलो होतो आणि रागातच मी माझं तिच्याशी असलेलं नातं आणि साखरपुडा मोडला. जर सुनीताने मला ५ दिवसांनी फोन करून समजावलं नसतं तर मी नीलमशी लग्न केलं असतं,” असं गोविंदाने सांगितलं.
“नागराज मंजुळे आकाशला…” मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली
गोविंदा म्हणाला, “मला तिच्याशी लग्न करायचं होतं आणि त्यात काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. माझ्या मते प्रेम आणि द्वेष या दोन भावना आहेत, ज्यावर माणसाचं नियंत्रण नसतं. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल आणि ते तुमच्यावर प्रेम करत असतील तर तुम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही.”
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांनी १९८७मध्ये लग्न केलं. त्यांना यशवर्धन आहुजा आणि टीना आहुजा नावाची दोन अपत्ये आहेत. टिनाने बॉलिवूड चित्रपटात कामही केलंय.