सनी देओलचा मुलगा करण देओल विवाह बंधनात अडकला आहे. त्यांच्या लग्नाला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होते. या लग्नाला धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी अभिनेत्री हेमामालिनी, त्यांच्या मुली ईशा व अहाना गेल्या नव्हत्या. पण, करण व द्रिशाला आत्या ईशाने पोस्ट करून लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सनी आणि ईशा जुन्या गोष्टी विसरून एक खास बॉन्ड शेअर करतात. काही वर्षांपूर्वी ईशाने तिची सावत्र आई आणि सनी देओलची आई प्रकाश कौर यांची भेट घेतली होती. खुद्द ईशाने याबाबतचा खुलासा केला होता.
‘नवभारत टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, हेमामालिनी यांच्या ‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’च्या बायोग्राफीमध्ये ईशाने प्रकाश कौर यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा खुलासा केला आहे. हेमामालिनी यांच्या कुटुंबीयांना धर्मेंद्र यांच्या घरात प्रवेश दिला जात नसल्याचा दावा करण्यात आला होता. धर्मेंद्र यांचे भाऊ आणि अभय देओलचे वडील अजित देओल यांच्याशी ईशा खास बॉन्ड शेअर करत असे. दरम्यान, २०१५ मध्ये अजित देओल खूप आजारी पडले होते आणि ईशाला भेटण्याची त्यांची इच्छा होती.
अजित देओल खूप आजारी होते आणि धर्मेंद्र यांच्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशा परिस्थितीत ईशाकडे धर्मेंद्र यांच्या घरी जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. यादरम्यान सनीने तिला अजित यांना धर्मेंद्र यांच्या घरी भेटण्यास मदत केली. त्यानंतर ईशा पहिल्यांदा धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना भेटली होती. ईशा पहिल्यांदाच प्रकाश कौर यांच्याशी बोलली होती. त्यांची भेट होताच ईशाने प्रकाश कौर यांच्या पायाला स्पर्श केला. प्रकाश कौर यांनी ईशाला आशीर्वाद दिला आणि तिथून त्या निघून गेल्या.
ईशा पुढे म्हणाली, “मला माझ्या काकांना भेटून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करायचा होता. ते अहाना व माझ्यावर खूप प्रेम करतात आणि आम्ही अभयच्या खूप जवळ होतो. त्यामुळे त्यांच्या घरी जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. म्हणूनच मी सनी भैयाला फोन केला आणि त्याने आमच्या भेटण्याची पूर्ण व्यवस्था केली.
धर्मेंद्र यांनी १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले. प्रकाश कौर यांच्यापासून त्यांना सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल व विजेता देओल अशी चार मुले आहेत. बॉलीवूडमध्ये आल्यावर धर्मेंद्र अभिनेत्री हेमामालिनीच्या प्रेमात पडले. दोघांनी १९८० मध्ये लग्न केले. हेमामालिनी यांना ईशा देओल व अहाना देओल अशा दोन मुली आहेत.