भारतीय चित्रपटसृष्टीत देशभक्तीपर चित्रपटांची काही कमी नाही. ‘उरी’, ‘शेरशाह’सारखे चित्रपट आजही सामान्य प्रेक्षकांच्या मनात देशभक्ती जागवण्याचे काम करतात. अशाच काही अजरामर चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘बॉर्डर’. स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हमखास टीव्हीवर लागणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला.
खासकरून यातील ‘संदेसे आते है’ हे गाणं ऐकलं की कोणाच्याही डोळ्यात अश्रू येतात. भारतीय जवानांच्या बलिदानाची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आणि त्यातील हे गाणं प्रचंड हीट झालं. संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं, जावेद अख्तर यांनी लिहिलेलं, सोनू निगम आणि रुपकुमार राठोड यांच्या आवाजातील ‘संदेसे आते है’ या गाण्याबद्दलचा एक किस्सा खुद्द अनु मलिक यांनी सांगितला आहे.
एएनआय शी संवाद साधतांना अनु मलिक म्हणाले, “बोर्डरची कथा फार वेगळी होती, तेव्हा मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात एका वेगळ्याच परिस्थितीतून जात होतो. त्यावेळी मला ‘ऊंची है बिल्डिंग’ किंवा ‘एक गरम चाय की प्याली हो’सारखी हलकी फुलकी गाणी बनवायची होती, पण माझ्यावर पंचमदा म्हणजेच आरडी बर्मन यांचा प्रचंड पगडा होता. त्यामुळे मी ‘ऊंची है बिल्डिंग’ अन् ‘ए जाते हुए लम्हो’सारखी गाणीही द्यायची इच्छा होती.”
पुढे अनू मलिक म्हणाले, “एक दिवस जेपी दत्ता माझ्याकडे आले आणि त्यांनी आपल्या भारतीय जवानांचे काही फोटोज मला दाखवले. त्यातील एका फोटोने माझं लक्ष विचलीत केलं तो म्हणजे सीमेवर संपूर्ण बर्फात उभा असलेला जवान. ते चित्र पाहून मी विचलीत झालो आणि एक प्रेमगीत तयार केलं. त्यावेळी जेपी दत्ता मला म्हणाले की तुझ्यात याहूनही उत्तम काम करायची क्षमता आहे. यानंतर मी बॉर्डरच्या अल्बमवर काम करू लागलो.”
‘संदेसे आते है’ गण्याबद्दलची आठवण सांगताना अनू मलिक म्हणाले, “एक दिवस जेपी दत्ता आणि जावेद अख्तर हे माझ्या म्युझिक रूममध्ये आले आणि त्यांनी मला ‘संदेसे आते है’ ऐकवलं. त्यावेळी ते गाणं मला एखाद्या गद्यासारखं वाटलं, त्याचा अंतरा आणि मुखडा कुठे? हे गाणं संपणार कधी? असं मी त्यांना विचारलं. त्यावर जावेद अख्तर जेपे दत्ता यांना म्हणाले, ही स्क्रिप्ट आत्ता यांच्याकडेच ठेवा, आपण एक महिन्यांनी येऊ तेव्हा यांच्याकडे गाणं तयार असेल.”
जेव्हा ‘ए गुजरने वाली हवा जरा’ या ओळी मी वाचल्या, मी हळूच स्वरात ते गाणं गुणगुणू लागलो. तेव्हा जावेद साहेबांनी मला विचारलं की मी काय म्हणतोय. त्यानंतर मी “वहाँ रहती है मेरी बुढी मां” ही ओळ म्हंटली आणि आपसूकच मी ते गाणं पूर्ण म्हणू लागलो. मी ११ मिनिटांचं गाणं तब्बल ७ मिनिटं ५० सेकंदात बसवलं. सगळ्यांना फारच आश्चर्य वाटलं होतं. जावेद अख्तर तर माझ्या म्युझिक रूममधील एक कॅसेट घेऊन माझ्यासमोर आले आणि म्हणाले, मला तुमची स्वाक्षरी मिळेल का?” यानंतर मात्र या गाण्याने इतिहास रचला.